धक्कादायक ! मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथे क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने मारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.

दरम्यान भगवान महाजन याने चौकशीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन (वय ६२) आणि सत्यवान महाजन (वय ५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील रहिवासी होते. दोन्ही एकाच घरात राहत असून त्याच्यात अनेकदा वाद व्हायचे. दि. १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यानी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी मारल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाल्याने भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला.

यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेवून तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला. दरम्यान गिरणेत मृतदेह आढळून आल्यानंतर भगवान हा घरातून गायब झाला. त्याने शुक्रवारी उत्राणमधील एकाला फोन करून बोलावून याची माहिती दिली. त्या व्यक्तीने भगवान महाजन याला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याची सांगितले. मात्र त्याने तेथून पलायन केले. शेवटी उत्राणच्या पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल स्थानकावरून भगवान महाजन याला अटक केले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.