१७ वर्षीय मुलीवर वारंवार सामुहिक बलात्कार, ६ जणांवर गुन्हा

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीतेला गर्भधारणा झाल्याने तिने गोळ्या घेवून गर्भपात केला.

आळी पाळीने सामुहिक बलात्कार

१७ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २ ते १९ जानेवारी २०२२ च्या दरम्यान पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर पाल येथील निर्जनस्थळी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केला. रावेर येथे संशयित आरोपी रवि छपरीबंद याने त्याच्या घरी डांबुन ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.

गोळ्या घेवून गर्भपात

पिडीतेने स्वत:ची सुटका केल्यावर देखील या चार संशयित आरोपींनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर पिडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाल्याने तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला.

लग्न कॅन्सरग्रस्त व्यक्तीसोबत

दरम्यान  पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त व्यक्तीसोबत  लावून दिले. याप्रकरणी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवि छपरीबंदची पत्नी आणि धीरज (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.