मोठी बातमी; मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहे. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील हे रविवारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. फडणवीसांना मला मारायचं आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी मला मारून दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते.

अंबडमध्ये रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. त्यानंतर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस होता. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंबलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. येत्या काळात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.