जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ७ सप्टेंबर गुरुवार सकाळपासूनच मुंबई, पुण्यासह मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या ४८ तासांत राज्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसणार आहे. मुंबईसह, पुण्यातही आज मुसळधार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात हळुहळू पावसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
त्यातच नैऋत्य आणि पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट ण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.