“मेरी माटी मेरा देश” स्फूर्ती देणारे अभियान

0

 

लोकशाही संपादकीय विशेष

 

भारताच्या स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. केंद्र शासनातर्फे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गेला आठवडाभर ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. या अभियाना अंतर्गत शालेय, महाविद्यालयीन, तसेच सामाजिक स्तरावर आणि तरुण-तरुणींमध्ये एक स्फूर्ती निर्माण होऊन देशाविषयी प्रेम आणि अभिमान वाढविणारे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आणि राबविले जात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहिदांच्या आठवणी दाखल त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. वीर आणि वीरांगणांच्या आठवणीने शहिदांच्या स्मृतींना वंदन करण्यात येत आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात ठीकठिकाणी शहिदांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे पथनाट्य सादर केले. त्यामुळे आमच्या तरुण पिढीला शालेय विद्यार्थ्यांना शहिदांनी देशभक्तीसाठी दिलेल्या बलिदानाची माहिती मनोरंजनातून मिळू शकली. अनेक शाळांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत भारतीय स्वातंत्र्यावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना वक्तृत्वातून देशाच्या स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास झाला. अनेक ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. जवळपास सर्वच शाळांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत देशाविषयी पंचप्राण शपथ घेण्यात आली. काही सामाजिक संस्था तसेच रुग्णालया अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रक्ताचा लाल रंग असतो आणि हे रक्त कुणाचेही प्राण वाचवण्यासाठी भेदभाव करत नाही. हा माणुसकीच्या जाणिवेचा संदेश आपोआप दिला जातोय. तो देण्याचा प्रयत्न स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर होतोय. ही बाब देशातील प्रेम आणि आत्मीयता वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत कसलेही राजकारण केले जात नाहीये. केवळ देशप्रेम या भावानेच या अभियानाकडे पाहिले जाते आणि अभियान अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्वत्र राबविले जात आहे, हे विशेष होय..

 

भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली. या 76 वर्षात अनेक राजकीय सरकारी आली आणि गेली. या कालावधीत देशाच्या प्रगतीचे सिंहावलोकन करण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्या देशातील गरिबी पूर्णपणे हद्दपार करण्यात एका तरी राजकीय पक्षाच्या सरकारला यश आले, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. आदिवासींचे जनजीवन सुधारले असले तरी अद्यापही अनेक पाड्यातील आदिवासींच्या जीवनातील अंधश्रद्धा दूर होणे गरजेचे आहे. ते अद्याप पारंपरंपरागत जीवन जगत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. तथापि शेतीतील उत्पादनाचे अर्थशास्त्र बदलण्यात स्वातंत्र्य देशातील सरकारांना अपयश आले आहे. त्यामुळे देशात विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतावर कुटुंबाचे चरितार्थ चालवू शकत नाही. म्हणून लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. अजून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारत नसल्याने आत्महत्या करण्याचे सत्र चालू आहे. स्वतंत्र भारताच्या 76 वर्षाच्या कालावधीत हे घडतेय, ही बाब आपल्या स्वतंत्र भारतासाठी लाजिरवाणी म्हणावी लागेल. सत्ता प्राप्तीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे जनजीवन, शेती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार अशी आश्वासने देतात. पण सत्तेवर आल्यानंतर याचा पूर्णपणे सत्ता प्राप्त राजकीय पक्षाला विसर पडतो, ही बाब स्वतंत्र देशातील 70 टक्के शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने चांगली नाही. अशी अनेक स्वतंत्र देशाची मान शरमेने खाली घालणारी उदाहरणे देता येतील. परंतु यामुळे मात्र आपण आपल्या देशावरील प्रेम कमी होऊ देता कामा नये. त्यामुळे स्वतंत्र भारतातील प्रत्येक जण आशेवर जगतो आहे. त्यात ‘मेरी माटी मेरा देश’ सारख्या अभियानांतर्गत सर्व दुःख विसरून स्वतंत्र भारतातील सर्वजण जनता म्हणतेय “भारत माता की जय…!”

Leave A Reply

Your email address will not be published.