उमेदवारीत भाजपची आघाडी अन्‌ मविआत कुरघोडी

इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या : पक्षश्रेष्ठींसमोर पेच कायम

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला असून, निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या रावेर व जळगाव मतदारसंघात एकाही उमेदवाराची मविआने अधिकृत घोषणा झालेली नाही. मविआला मुहूर्त गवसत नसून त्यांचे श्रेष्ठीही एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.

महाविकास आघाडीकडून भाजपाला टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सुरु असतांना त्यांना तसा उमेदवार अद्यापही हाती लागलेला नाही. आयात उमेदवारांच्या नावावर अधिक चर्चा होतांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, देशभरात सात टप्प्यात, तर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत 5 टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या आठ जागा आहेत. निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच भाजपने त्यांच्या कोट्यातील सहा जागांचे उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये भाजपने जळगावला धक्कातंत्र वापरले असून उर्वरित रावेर, नंदुरबार, धुळे व अहमदनगर मतदारसंघांत विद्यमानांना पुन्हा एकदा संधी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील आठही जागांवरील उमेदवारांच्या नावावरून खल कायम आहे.

भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिलेल्या सहाही जागांवर भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. जळगाव मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाच्या वाटेला आला असून शिवसेनेकडून रोज नवनवे नावे समोर येत असून रावेर मतदारसंघातही तोच कित्ता गिरविला जात आहे. रावेरात राष्ट्रवादीकडे पूर्वी चार व आता नव्याने तीन नावे आली आहेत. या सर्व इच्छुकांना काही मर्यादा असल्याने त्यांचे नाव पक्के होत नाही.

इच्छुकांच्या घिरट्या वाढल्या!

महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे अंतिम झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही नावांची घोषणा होणे बाकी आहे. जळगाव, रावेर येथे महाविकास आघाडी धक्कातंत्र देऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र या साऱ्या राजकीय घडामोडीत लोकसभेची पायरी चढण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून अखेरच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातून इच्छुकांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र जोमात सुरू असून ते जनतेच्या दारातही घिरट्या घालत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.