बोदवड बाजार समितीत सत्तापालट होणार

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या होत असल्या तरी जिल्ह्यातील बोदवड बाजार समिती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून बोदवड बाजार समितीत माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची एक हाती सत्ता आहे. परंतु एकनाथ खडसे यांच्यासमोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना भाजपच्या युतीतर्फे बनवलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलने फार मोठे आव्हान उभे केले आहे. आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एकतर्फी झाल्या होत्या. एकनाथराव खडसे यांना विरोधकांकडून तगडा विरोध होत होता. परंतु यंदाच्या बोदवड बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत खडसेंतर्फे महाविकास आघाडीचे पॅनल बनवण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे लढत दिली जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला खडसेंच्या पॅनलमध्ये स्थान नसल्याने काँग्रेस समर्थकांची साथ मिळेल याची शक्यता कमी आहे. त्यातच गेल्या पंचवीस वर्षे बोदवड बाजार समितीत एक हाती सत्ता असताना खडसेंकडून बोदवड बाजार समितीचा कसलाही विकास केला गेलेला नाही. बोदवड बाजार समितीत तीन तालुक्यांचा समावेश असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने आवक घटली. बोदवड बाजार समिती अंतर्गत असलेल्या मुक्ताईनगर, वरणगाव आणि जामठी उपशाखा पाहिजे तशा विकसित झालेल्या नाही. बोदवड मुख्य बाजार समितीतही शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा व्हायला हव्या त्या झालेल्या नाहीत. शेतीमाला रात्री घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याच्या निवासाची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची कुटुंबना होते. सकाळी आठ वाजता शेतीमालाचा लिलाव व्हायला हवा तो होत नाही. बोदवड बाजार समितीला आव्हान देणारे एकूण सहा खाजगी व्यापारी केंद्र आहेत. या व्यापारी केंद्रांवर शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून त्यांची लूट केली जाते. अशा प्रकारे मुख्य आरोप एकनाथराव खडसेंवर शिवसेना-भाजप प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये आमदार चंद्रकांत पाटलांतर्फे केला जात आहे. त्यामुळे खडसेंच्या शेतकरी विकास पॅनल समोर यंदा फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील काही मोजक्या मतांमध्ये होणारी निवडणूक असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचा प्रचार होत आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील विशेषतः भाजप यांचे दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे नेतृत्व एकनाथराव खडसे करीत असले तरी त्यांना बोदवड बाजार समितीच्या निवडणूक प्रचारात गुंतवून ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होत आहे. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांना आता भाजपतर्फे पूर्ण समर्थन देऊन बोदवड नगरपंचायत निवडणुकीची सत्ता जशी चंद्रकांत पाटलांना मिळवून दिली, तसेच भूमिका भाजपतर्फे बोदवड बाजार समिती निवडणुकीत घेतली जात आहे. विशेष म्हणजे राज्यस्तरावरील भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे संकट मोचक म्हणवले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल उमेदवारांच्या पोस्टरवर छायाचित्र वापरून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

 

निवडणूक प्रचाराला दोन्ही पॅनल कडून जोरदार सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांनी प्रचाराच्या सभा गाजत आहेत. एकनाथराव खडसेंना जशास तसे शेतकऱ्यांच्या भाषेत उत्तर आमदार चंद्रकांत पाटलांकडून दिले जात आहे. खडसे जे जे बोलतील ते त्याच भाषेत आमदार चंद्रकांत पाटलांकडून खोडले जात आहे. त्यामुळे बोदवड बाजार समिती निवडणूक प्रचार म्हणजे एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी गाजत आहे. गेल्या चार वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत जेवढा मतदार संघाच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत पाटलांनी जेवढा निधी आणला तेवढा गेल्या पंचवीस वर्षात मतदार संघाच्या विकास खडसेंकडून झाला नाही हा प्रमुख आरोप केला जातोय. तालुका निहाय बाजार समिती असाव्यात त्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून ते आम्ही करणार, असा मुद्दा प्रचारात आमदार चंद्रकांत पाटलांकडून होतोय. शेतकऱ्यांच्या केळीचे भाव आज बऱ्हाणपूर मधून जाहीर होतात. ते जळगाव जिल्ह्यातून जाहीर झाले पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. हा मुद्दा सुद्धा चंद्रकांत पाटलांकडून प्रचारात लावून धरला जात आहे. बाजार समिती निवडणुकीत असलेल्या प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप पॅनलच्या शेतकरी परिवर्तन पॅनलतर्फे केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंसमोर बोदवड बाजार समिती निवडणुकीचे फार मोठे आव्हान शिवसेना-भाजपतर्फे करण्यात आले असल्याने ही निवडणूक जिल्ह्यातील प्रतिष्ठेची बनली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.