अकबर हिंदू होता… भालचंद्र नेमाडेंचे वक्तव्य…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

“मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” (Samrat Akbar) असं मोठं विधान ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त (Gyanpeeth Award) ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी केलं आहे. हे सांगतानाच त्यांनी आपल्याकडे नैतिकता म्हणजे धर्म असंही नमूद केलं. तसेच अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे, असंही नेमाडेंनी नमूद केलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) खाजगी वाहिनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

ते म्हणाले, “आपल्याकडे धर्म म्हणजे तुमची नैतिकता होय. नैतिकतेला धर्म म्हटलं जात होतं. खानेसुमारीपासून ख्रिश्चन, मुस्लीम असे धर्म सुरू झाले. त्याआधी आपल्याकडे असे धर्म नव्हते. आपण वारकरी होतो, लिंगायत होतो, कुणाची बायको महानुभव असायची, कुणी वारकरी असायचं, नाथ संप्रदायी असायचे, कुणी बौद्ध असायचे. आपल्याकडे अनेक सरमिसळी होत गेल्या. असा धर्म आपल्याकडे कधी नव्हता.”

“आपल्याकडे हिंदू असणं म्हणजे सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू होते. अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे. कारण अकबरसह सगळे हिंदूच होते. ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती. हे आपण मान्य केलं पाहिजे की, आपण सगळे एकच आहोत,” असं मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं.

“आता धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या पाहिजे. त्या ठिकाणी नैतिकता आणि देश ठेवलं पाहिजे. धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या तरच आपल्यासह संपूर्ण जगाची सुटका होईल. अन्यथा कठीण आहे,” असंही भालचंद्र नेमाडेंनी नमूद केलं.

“दुर्दैवाने मधल्या काळात हा वेगळा, तो वेगळा असं झालं. एकमेकात द्वेष पसरवण्यात आला. त्यामुळेच आपल्या देशाची फाळणी झाली. त्यातून नुकसान झालं. पाकिस्तानचे लोक युद्धावर आर्थिक खर्च करतात, आपणही खर्च करतो. दोघांचंही नुकसान होत आहे. हे या धर्म कल्पनेमुळे झालं.” असही भालचंद्र नेमाडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.