बौद्धिक संपदा हक्क

0

लोकशाही, विशेष लेख

 

बौद्धिक संपदा ही प्रत्येकास मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे. ती एक अंगीभूत क्षमता किंवा कला म्हणता येईल व त्याचे स्वामित्व हे त्या व्यक्तीकडेच असते. कारण ती त्याचीच संपदा असते ज्याला दुसऱ्या भाषेत मालमत्ता अथवा प्रॉपर्टी असे म्हणतात. सध्याच्या कोर्पोरेट जगात प्रत्येकाची बौद्धिक संपदा (Intellectual property) हा त्याचा एक महत्वाचा गुण समजला जातो म्हणून त्याला आज महत्व प्राप्त झाले आहे.

कारण हीच बौद्धिक संपदा त्याची अंगीभूत संपदा आहे. इतर सर्व त्याने मिळविलेल्या फ्लॅट, घर, जागा, गाडी, बांगला,शेती इत्यादी इतर सर्व दृश्य मालमत्तापेक्षा बौद्धिक संपदा ही वेगळी आहे. कारण ती अंगीभूत असल्याने ती अदृश्य आहे. पण त्यातून निर्मिती झालेली सर्वकाही दृश्य आहे. ज्याप्रमाणे इतर सर्व मालमत्तासाठी कायदे आहेत त्याप्रमाणे बौद्धिक संपदेसाठीही कायदे आहेत व त्यांना बौद्धिक संपदा हक्क म्हणतात. याच बौद्धिक संपदेतून नवकल्पनाची निर्मिती होते व त्यातूनच नवनिर्मिती होते. उदा. लेखकाच्या कल्पनेतून साहित्याची निर्मिती होते, संशोधकाच्या शोधक बुद्धीतून नवीन संशोधन आकाराला येते, त्याच प्रमाणे एखाद्या निर्मिती प्रक्रियेमध्ये नवीनता आणता येते, उत्पादनाची सर्वच परिमिती बदलून नवीन उत्पादन निर्मिती शक्य होते.

सध्याच्या सॉफ्टवेअर, दूरसंचार, मोबाईल यासोबतच रोजच बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात उत्पादन आणि सेवेमधली नवनिर्मिती ही मानवी बौद्धिक क्षमतेचाच अविष्कार असतो. साध्या मोबाईल फोनचा जरी विचार केला तरी मोबाईल फोनचे डिझाईन, त्यातील फीचर्स त्याद्वारे मिळणाऱ्या सेवा ह्या दिवसागणिक बदलणाऱ्या आहेत. त्यामुळे एका मोबाईल फोनचे आयुष्य हे काही दिवसावर येऊन ठेपले आहे अशा या युगात मानवी बुद्धिमत्तेची कार्यक्षमता किती उच्च पातळीवर असावी किंवा असणे गरजेचे आहे हे लक्षात येते. सॉफ्टवेअर निर्मिती ही आज सर्वांच्या गरजेनुसार होणे अत्यावश्यक बनले आहे. बँकांपासून शाळेपर्यंत आणि साध्या दुकानदारापासून ते मोठ्या मॉलपर्यंत सर्वच ठिकाणी सॉफ्टवेअर वापरूच व्यवहार होतात म्हणजे त्यातही मानवाच्या बौद्धिकतेतून निर्मिती व्हावी हे अपेक्षितच असते.

उत्पादनाच्या बाबतीतही हेच पाहवयास मिळते म्हणून तेथेही बौद्धिक संपदेचा अधिकार हा महत्वाची भूमिका बाजवतो. कोरोना (Corona) काळात अनुभवास आलेली औषधाची महती ही सर्वांना कायम लक्षात राहील. अशीच आहे इंजेक्शनपासून लसीपर्यंत सर्व काही निर्माण करावे लागले ते देखील मानवी बुध्दीमत्तेतूनच म्हणून याकाळाने आपणास शिकविले ते बौद्धिक संपदा हक्काचे महत्व. म्हणून आज छोट्या उद्योगापासून ते मोठ्या कोर्पोरेट उद्योग पर्यंत सर्वानाच बौद्धिक संपदा हक्क या विषयाचे महत्व पटले आहे.

कायद्याच्या भाषेत जसे इतर मालमत्तेच्या संदर्भात कायदे आहेत. म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, उत्तराधिकारी कायदा इत्यादी कायदे आहेत. त्याच प्रमाणे बौद्धिक संपदा हक्क कायदा ज्यामध्ये पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पण बौद्धिक संपदा हक्क म्हणजे फक्त पेटंट असा एक गैरसमज रूढ आहे तो चुकीचा आहे पेटंट सॊबतच कॉपीराईट (Copyright), ट्रेडमार्क (Trademark) हे देखील महत्वाचे आहेत औद्योगिक कल्पनाचित्रे म्हणजे डिझाइन्स तयार करण्याची पद्धत, संकल्पना, कायदेशीर भूमिका, नोंदणीची पद्धत याचा समावेश बौद्धिक संपदा कायद्यात होतो व त्यानुसार पेटंट नोंदले जाते. त्याचप्रमाणे ट्रेडमार्क ही त्या कंपनीची ओळख असते व त्याचा संबंध गुणवत्ता, दर्जा, विश्वास यांच्याशी असतो.

पारले बिस्किट्स (Parlay Biscuits) हे त्यांच्या मुलाच्या ट्रेडमार्कवरून ओळखले जातात. कॉपीराईट सर्वच प्रकारच्या नवनिर्मितीसाठी असतो मग नाट्य, नृत्य या पासून ते कथा कादंबरी, लेख या सर्वच साहित्य प्रकारांसाठी ते लागू होते म्हणून आज ह्या सर्वच कायद्यांची माहिती असणे हे गरजेचे आहे कारण त्यांचे महत्व हे वाढणारच आहे म्हणून या लेखाद्वारे त्याचा परिचय व्हावा ही अपेक्षा आहे.

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
मो. नं. ९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.