भारतीय गणिती : आचार्य ब्रम्हगुप्त

0

लोकशाही, विशेष लेख

काही गणितज्ञांचे कार्य असे असते की, त्यांच्या हयातीमध्ये त्यांचे कार्य लोकांच्या फारसे नजरेत भरत नाही. परंतु त्यांच्या मूलभूत संशोधनाचे उपयोजन करून जेव्हा एखादा गणिती आपली विधाने किंवा प्रमेय सिद्ध करून दाखवतो तेव्हा त्या गणितज्ञाचे नाव जगप्रसिद्ध होते. काही गणितींचे अस्तित्व त्यांच्या ग्रंथसंपदेमुळेच असते. आचार्य ब्रम्हगुप्त (Acharya Brahmagupta) यांच्याबाबतीत आपल्याला असेच म्हणता येते. थोर भारतीय गणितज्ञ आणि ज्योतिषशास्त्रज्ञ ब्रम्हगुप्त यांचा जन्म इ. स. ५९८ मध्ये झाला. आचार्य ब्रम्हगुप्त यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी ब्रम्हस्फुट सिद्धांत (Brahmasphuta Siddhanta) हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात १०२० श्लोक आणि २४ अध्याय आहेत. त्यांनी वयाच्या ६७व्या वर्षी खंडखादयक हा ग्रंथ लिहिला. आचार्य ब्रम्हगुप्त हे ज्योतिर्गणिती वराहमिहीर (Jyotirganiti Varahamihir) यांचे शिष्य होते. भुमिती विषयात अत्यंत मौलिक भर घालणारे आचार्य ब्रम्हगुप्त यांचा एक सिद्धांत आज प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये टॉलेमीचा सिद्धांत या नावाने अभ्यासला जातो. हा सिद्धांत पुढील प्रमाणे आहे.

“चक्रीय चौकोनाच्या संमुख भुज्यांच्या लांबीच्या गुणाकारांची बेरीज ही त्याच चौकोनाच्या दोन्ही कर्णाच्या लांबीच्या गुणाकारा एवढी असते.”
जर ABCD हा चक्रीय चौकोन असेल तर,
[AB X CD] + [AD X BC] = [AC X BD]

ब्रम्हगुप्तांनी चक्रीय चौकोनाच्या क्षेत्रफळाचे जे सूत्र शोधून काढले होते. आचार्य ब्रम्हगुप्तांनी त्यांच्या ग्रंथात उल्लेखित केलेला गुणधर्म पुढील प्रमाणे आहे. “जर चक्रीय चौकोनाच्या बाजुची लांबी a, b, c आणि d असेल आणि s ही त्याची अर्ध परिमिती असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ A = √s(s−a)(s−b)(s−c)(s-d) असते. हे सूत्र आता (ब्रम्हगुप्त यांच्या नंतर सुमारे एक हजार वर्षानंतर जन्मलेल्या) हिरोच्या नावाने ओळखले जाते.

आचार्य ब्रम्हगुप्तांनी भुमितीचे ज्ञान खूप समृद्ध बनविले, अत्यंत थोर गणित परंपरा लाभलेल्या आपल्या भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. प्राचीन काळी मुद्रणकला नव्हती, गणकयंत्रे नव्हती, मोजमाप करण्याची प्रमाणित साधने उपलब्ध नव्हती. अशा काळात त्यांनी अत्यंत समृद्ध आणि बहुमूल्य काम केले आहे.

कु. गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.