शून्य कार्बन उत्सर्जनसाठी नवी अपारंपरिक ऊर्जा एकमेव पर्याय

0

लोकशाही, विशेष लेख

 

पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), सीएनजी (CNG) सारख्या पारंपरिक जीवाष्म इंधनाच्या अतिरेकीवापरामुळे वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन सातत्याने वाढतेय. पर्यायाने जागतिक तापमान वाढीची समस्या आता गंभीर स्वरूप धारण करताना दिसतेय. याच पारंपरिक स्वरूपाच्या इंधनाचा कमीतकमी वापर करून नव्या अपारंपरिक स्वरूपाच्या इंधनाचे पर्याय स्वीकारून पर्यावरण रक्षणासाठी युद्धपातळीवर कृतिशील प्रयत्न व्हावेत, याकरिताच भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि तेल वायू मंत्रालयाच्या वतीने जनजागृतीकरिता ‘सक्षम ‘ अर्थात संरक्षण क्षमता महोत्सव ही मोहीम देशपातळीवर राबविली जाते. यंदाची सक्षमची थीम ही ऊर्जा संरक्षण शून्य कार्बन उत्सर्जनासाठी ही आहे. याच अनुषंगाने शून्य कार्बन उत्सर्जनसाठी नवे अपारंपरिक ऊर्जेचे पर्याय या लेखाचे नियोजन.

पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासूनच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतुचक्र अव्याहतपणे सुरु आहे. परंतु, मागील काही दशकांचा गांभीर्याने विचार केला तर लक्षात येत की, प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा मागील काही वर्षातील तापमानाचे उच्चांक मोडणारा उन्हाळा जाणवू लागलेला आहे. याच वाढत्या उष्णतामानाचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर प्रकर्षाने होऊ लागलेले आहेत. यापूर्वी कधीही न ऐकलेले अनेक विषाणूजन्य आजार आता सर्रास उदभवताना दिसू लागले आहेत. अर्थात उष्माघाताचे सर्वात भयंकर दुष्परिणाम म्हणजे दरवर्षी मानवाचे बळी जाऊ लागलेले आहेत. या वाढत्या उष्णतामानाचे प्रमुख कारण हे ‘ग्लोबल वार्मिंग’ अर्थात जागतिक तापमानवाढ हेच असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांनी सिद्ध देखील केलेलं आहे. परंतु, या तापमानवाढीचे मूळ जर शोधले तर जगभरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी वायू आणि विद्युत निर्मितीकरिता वापरला जाणारा कोळसा. यासारख्या ज्वलनशील अशा इंधनाच्या अतिरेकी वापरामुळेच वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनडायॉकसाईड (carbon dioxide), आणि स्क्रबनं मोनोकसाईड (Scrub with monoxide) सारखे भयंकर विषारी वायू वातावरणात सोडले जात असल्याने वायू प्रदूषणाचे स्वरूप इतके गंभीर बनलेले आहे की पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर संरक्षक कवच म्हणून असलेला ओझोनचा स्तर देखील लुप्त होऊन सूर्याची तप्त निल किरणे थेट पृथ्वीवर पडू लागल्याने उष्णतामान दरवषी वाढतेय हे सत्य आहे.

मुळातच उत्क्रांतीच्या एका टप्प्यात मानवाला चाकाचा शोध लागला. पुढे पेट्रोल, डिझेल, सीएनजी वायू यासारख्या नैसर्गिक जीवाष्म इंधनाचा वापर करून मानवाने याच चाकाला गती दिली आणि स्वतःची उत्तुंग अशी प्रगती साधली. परंतु, विकासाच्या या वेगात अत्यंत भयानक स्वरूपातील या जीवाष्म इंधनाचा वापर आपण सगळ्यांनीच इतक्या अतिरेकी स्वरूपात चालवलेला आहे की इंधनाचे हे स्रोत भविष्यात संपुष्टात येणार आहेतच; मात्र या इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बनडायॉकसाईड सारख्या विषारी वायूमुळे मानवी जीवनच धोक्यात आलेले आहे. त्यामुळेच, वातावरणात सर्रास होत असलेल्या याच ‘कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण हे शून्यावर कसे आणता येईल’ यासाठी आता वेगाने कृतिशील आणि नैसर्गिक इंधनाला पर्यायी स्वरूपाची कार्यवाही होणे ही येत्या काळाची गरज आहे.

वातावरणातील कार्बनचे घातक प्रमाण अगदी शून्यावर आणून संपूर्ण प्रदूषणमुक्ती करिता काही उपायांचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा अनेक पर्याय आपल्याला सहज सापडतात ज्याची तातडीने आणि सक्तीने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, पेट्रोल, डिझेल, सीएनजी सारख्या पारंपरिक ऊर्जेचा वापर हा केवळ गरजेपुरता आणि अपरिहार्य तत्त्वावरच व्हायला हवा. सार्वजनिक बस (public bus), रेल्वे (Railway), मेट्रोच्या प्रवासाची सक्ती सुरु केली गेली तर कितीतरी मोठ्या प्रमाणात इंधन बचत होईलच शिवाय वातावरणात कार्बनचे होणारे उत्सर्जन हे खूपच कमी होईल. याबरोबरच, अपारंपरिक ऊर्जेचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढवायला हवा.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलची आता आपल्या देशात सर्रास विक्री होऊ लागलेली आहे. (आपल्या देशाचे रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम संपूर्ण इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालणारी मोटार खरेदी करून एक आदर्श घालून दिला आहे.) या पेट्रोल मुळे प्रदूषण तर कमी होतेच आणि जे इथेनॉल ऊसापासून मिळते त्या शेतकऱ्यांना देखील यामुळे अर्थार्जनाची नवी संधी प्राप्त झाली आहे. शिवाय, पारंपरिक इंधनाची मोठ्या प्रमाणत बचत होते आहे.

कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी विद्युत मोटारींचा पर्याय हा एक अतिशय सर्वश्रेष्ठ पर्याय सापडला आहे. या मोटारींमुळे प्रदूषण शून्यावर आणणे सहज शक्य आहे . शासकीय पातळीवर आता विदुयत मोटारी सक्तीच्या केल्या गेल्या आहेत. सार्वजनिक स्तरावर विद्युत मोटारींची सक्ती ही करायलाच हवी . प्राण्यांची चरबी. किंवा तेल, भाजीपाला यांच्या पुनर्प्रक्रियेतून तयार होणारे बायोडिझेल हा एक अपारंपरिक ऊर्जेचा एक नवा उत्तम पर्याय आहे तर हायड्रोजन हे देखील संभाव्य उत्सर्जन मुक्त पर्यायी इंधन आहे. नैसर्गिक वायू प्रोपेन जे नवीकरणीय डिझेल बायोमास व्युत्पन्न वाहतूक इंधन आहे त्याच्या वापरामुळे देखील कार्बन उत्सर्जनास नक्कीच आळा बसू शकेल.

शाश्वत विमानचालन इंधन नूतनीकरण योग्य फीड स्टोक मधून मिळवलेले हे इंधन जे पारंपरिक इंधनाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत करते. वातावरणातील कार्बनचे वाढते उत्सर्जन शून्यावर आणून प्रदूषणमुक्तीचा सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली सौरऊर्जा. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारींचा प्रयोग परदेशात यशस्वी होऊन त्याची अमलबजावणी देखील सुरु झालेली आहे सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांना शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आता टाकायला हवे.

शेवटी, मानवाने पारंपरिक स्वरूपाच्या जीवाष्म इंधनाच्या जोरावर ज्या चाकाला गती देऊन विकासाची एक अत्यंत भन्नाट प्रवास साध्य केला आहे तो विकास हा मानवी कल्याणासाठीच आहे. जर प्रदूषणामुळे मानवी जीवनच धोक्यात येणार असेल तर अशा विकासाला शून्य अर्थ असेल. म्हणूनच वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी नव्हे ते शून्यावर आणण्यासाठी अगदी आज, आता, ताबडतोप मिशन शून्य कार्बन उत्सर्जनाची मोहीम ही अगदी, वैयक्तिक, शासकीय, सार्वजनिक अशा सर्वच पातळ्यांवर युद्धपातळीवर राबवून पुढील वर्षभरातच प्रदूषण मुक्तीचे हे मिशन यशस्वी करायलाच हवे असे वाटते.

सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.