शोधितां न सापडे वेदशास्त्रा | दृष्टी न पडे व्दिसहस्त्रनेत्रा | पंचमुखा दुर्लभ … !

0

भगवान कृष्ण वेद शास्त्रांना न सापडणारा, दोन हजार डोळ्यांचा शेषशायी ज्याने ही पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशा रामअवतारातील लक्ष्मणला व कृष्ण अवतारातील बळीभद्राला एका ठिकाणावर दिसत नाही. ब्रम्हदेवाने कितीही शोध घेतला त्यालाही न समजणारा असा व महादेवालाही जो आराध्य आहे असा ब्रम्हांडनायक द्वारकाधीश भगवान कृष्ण ! सहजासहजी कुणाच्या हाती लागत नाही.

निराहारी फलाहारी । नग्न मौनि जटाधारी ॥ बहु शोधिता गिरिकंदरी । परी श्रीहरी न सापडें ॥

पंचाग्नी साधना करतांना जे भयंकर तप करतात निराहार राहतात फळे कंदमुळे खाऊन नग्न जटाधारी राहून जे आपल्या तपसामर्थ्याने हिमालयासारख्या गिरीकंदरी राहतात त्यांनाही भगवंत सहज भेटत नाही.

हरि नातुडे बळवंता | न चढे धनवंताच्या हाता ॥ चतुःषष्टी कला दाविता । ठायी न लागता पडेना ||

हे देखील वाचा

सद्बुद्धी मज द्यावी

तो बलपूर्वक किंवा ताकद दाखवून धरता येत नाही. शिवाय तो धनवंताच्या हाती सहज सापडेल असेही नाही ? चौदा विद्या चौसष्ट कळांनी युक्त अशा तपस्वी ऋषी मुनिंनाही तो सापडत नाही असा हा नंदाचा बाळकृष्ण. मातेने एकदा उखळाशी बांधला. गोकुळात खोड्या करून गोप गौळणींचे दहि, दुध, ताक, लोणी खाणारा बालकृष्ण मुद्दामहून एकदा यशोदेच्या हाती लागला मायेने भगवंताला उखळाशी बांधले व ती घरात निघून गेली. गोपालकृष्णांनी खेळता खेळता ज्या उखळाशी बांधला होता ते उखळ अंगणात आणले व दोन्ही झाडांच्या ढोलीत उखळ अडकवले. त्याचवेळी दोन्ही झाडे एकदम अंगणात कोसळली त्यातून दोन दिव्य पुरुष बाहेर आले हे कुबेरपुत्र यमलार्जून होते. त्यांचा उध्दार झाला त्या दोघांनी भगवंताला नमस्कार केला व ने अंतर्धान झाले.

हे देखील वाचा

जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

घराबाहेर कृष्ण खेळत असतांना झाडं पडल्याची वार्ता यशोदेच्या कानी पडली. माता बाहेर धावत आली पाहते तर जवळ कृष्ण खेळत आहे हे पाहून तिनं कृष्णाला तातडीने उचलून घेतले. नंद यशोदेने हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहिला.

वार्ता ऐकोनि श्रवनीं | हृदय पिटी धावती जननीं ॥ धारती सकळ गोपाळ गौळणी || नंदांगणी दाटी जाहली ॥

संपूर्ण गोकुळातील गोप गोपिका धावत आल्या. कृष्णाच्या अंगावर झाडे पडली. त्याला लागलं तर नाही ना ? म्हणून नंदराजाच्या अंगणात लोकांची दाटी झाली. नंदराजाकडून पुन्हा मायेने त्याला कडेवर घेतले. यशोदेच्या डोळ्यांमधून अश्रूधारा वाहत होत्या ती स्फुंदस्फुंदोनी रडत होती माझे हे हात जळोत मी नाहक माझ्या बाळकृष्णाला उखळाला बांधले. मोठा अनर्थ चुकला ? नंदराजा त्यावेळेला म्हणाला:- वादळ नाही वारा नाही मग ही झाडं अचानक कशी काय पडली ? सर्वांना त्याचे आश्चर्य वाटले. तेथे कृष्णाचे बालसवंगडी खेळत होते त्यांनी सांगितले हे नंदबाबा आम्ही डोळ्यांनी पाहिले कृष्णाने ही दोघं झाडं आपल्या हाताने मोडून टाकली ! एवढंच नाही या दोन वृक्षांमधून दोन दिव्य पुरुष बाहेर आले ते कृष्णाशी काय बोलले हे आम्हाला कळले नाही ? परंतू ते उधर्व पंथे नंतर आकाशमार्गे निघून गेले. हरिविजय ग्रंथाच्या ९व्या अध्यायात यमलार्जुन उध्दार कथा विस्ताराने कवी श्रीधर यांनी कथन केली आहे. कृष्णाच्या बाललिला अगाध न अनुपम आहेत.

या नवव्या अध्यायाला कवी श्रीधर स्वामींनी सागराची उपमा दिली आहे. या समुद्रात अनेक साहित्यरत्ने आहेत. शोधक साधकांनी या सागरात बुड्या मारून एकेक रत्नांचा शोध घ्यायचा आहे. थोडक्यात हा नववा अध्याय वाचल्याशिवाय सागरातील अलंकारांचा शोध घेता येणार नाही… ही रत्ने सद्गुणरूपी दोरीत ओविली आहेत. अशी ही रत्न, हिरे, माणिक, मोत्यांची माळ संताच्या गळ्यात रुळत आहे. गुरुकृपे शिवाय ही मुक्तमाळा हाती लाभणे शक्य नाही .. !

रमेश जे. पाटील
आडगांव ता. चोपडा
जि. जळगांव (खान्देश)

९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.