सद्बुद्धी मज द्यावी

0

सद्बुद्धीचे महत्व आध्यात्मिक व प्रापंचिक जीवनात दोन्ही जीवनपद्धतीत आहे. सद्सद्विवेक बुद्धीने विचार करणे याचाच अर्थ सद्बुद्धीचा वापर करणे असाच आहे. आपल्या विचारांना अथवा कृतीला विवेकाच्या कसोटीवर आजमावून पाहणे हि प्रक्रिया जो व्यक्ती करतो त्याची बौद्धिक क्षमता अधिक असल्याचे मानले जाते मुळात बुद्धी सर्वानाच असते पण सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी होणे हे व्यक्तीच्या वैचारिक जडणघडणीवर अवलंबून असते हि जडणघडण संस्कारातून होत असते असे जरी असले तरी दुर्बुद्धी केव्हा आपला प्रभाव दाखवेल हे कधी सांगता येत नाही म्हणून आपली बुद्धी कायम सद्बुद्धी रहावी या करीत बौद्धिक प्रबोधनची गरज असते हे प्रबोधन करण्याचा अधिकार संतांना असतो कारण त्यांच्या अंगी विवेक असतो संत ज्ञानेश्वर माउली यांनी म्हटलेच आहे.

शम्भू तेथ अंबिका
संत तेथ विवेका

संतांच्या शिकवणुकीतून, साहित्यातून वेगवेगळ्या ग्रंथांद्वारे आपले बौद्धिक मळभ दूर करून सद्बुद्धीचा सन्मार्ग आपण आक्रमित करावा यासाठी या मार्गाचे महत्व आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी मध्य सांगितलेला दृष्टांत फारच मार्मिक आहे ते म्हणतात.

जैसे दिपकळिका धाकुटी।
परी बहु तेजाने प्रकटी ।
तैसे सद्बुद्धी ये थेंकुटी।
म्हणो नये ॥

या दृष्टांताप्रमाणे एखाद्या अंधार पसरलेल्या खोलीमध्ये छोटा दिवा अथवा पणती लावली तर तिच्या प्रकाशात किंवा तेजात अंधार दूर होतो. सद्बुद्धीचे तसेच आहे. आपल्याला सद्बुद्धी झाली म्हणजे अज्ञान दूर होऊन योग्य तीच कर्मे सुचतात राग, लोभ, मोह, आदी विकारांनी आपल्याबुद्धीवर जी पुटं चढली आहे ती दूर करण्यासाठी व बुद्धी प्रकाशित करण्यासाठी भवरोग दूर सारणे व बुद्धी सद्बुद्धीकडे वळविणे हाच उपाय आहे. शिक्षणाने बौद्धिक पातळीत वाढ होते. पण ती सद्बुद्धीच असेल हे सांगता येत नाही. म्हणून शिक्षणासोबत मूल्येही शिकवली किंवा शिकली पाहिजे सर्व बुद्धीमंतांची बुद्धी सद्बुद्धी झाल्यास केवढी मोठी कर्मे घडतील हे सांगता येत नाही म्हणून माउली म्हणतात त्या प्रमाणे..

तैसे सद्बुद्धी ये थेंकुटी ।
म्हणो नये ॥

आपल्या बुद्धीस या प्रमाणाची मात्र दिल्यास सन्मार्गाची दिशा आपण आक्रमित करू म्हणून आपण प्रार्थनेमध्ये सदैव मागणे मागतो सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे जेणेकरून आपल्या मार्गक्रमणाची दिशा कायम सन्मार्गाची असेल व दुर्बुद्धी पासून दूर असू एवढेच.

प्रा. नितीन मटकरी
जळगाव
९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.