जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

0

करुणाष्टक- 13

सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनि आलें I
भजन सकळ गेलें चित्त दुश्चित जालें II
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना I
परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना II

नुकतीच आपण ‘होंडा एक्टिवा’ घेतलेली आहे. मॉडेल सुंदर आहे, नवीन आहे. एका मुहूर्तावर आपण ऑफिसला निघालो आहे. गाडीचा वेग बरोबर असतो. नियम आपण व्यवस्थित पाळतोय. रस्त्याच्या कडेने आपण चाललोय. आपला काही दोष नाही आणि पाठीमागून एखादा सायकल स्वार येतो त्याचीही खूप चूक नसते. तो आपल्या गाडीवर येऊन धडकतो. आपण कोलमडतो. नवीन गाडी ही पडते. आपला पाय फॅक्चर होतो. म्हणजेच नकळत दुःख पुढे येऊन उभे राहते. अशी लहान-मोठी सुख-दुःख येत राहतात. सुखाच्या क्षणाला ही दुःखाची किनार येते. वाटत असं का घडलं, काही चूक नसताना. पण समर्थांचे वचन आठवते, “जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुच शोधूनी पाहे”

इंद्रियाधिष्ठित जे सुख आहे ते कनिष्ठ आहे. मनावर अवलंबून जे सुख आहे ते ही अधम आहे.बुद्धीवर अवलंबून असलेले सुख हे मध्यम प्रतीचे आहे. खरे सुख “किंबहुना सोये, जीव आत्मयाते लाहे” जीवाला जेव्हा आत्मानंदाची चुणूक अनुभवायास मिळते तेव्हाच खरे सुख प्राप्त होते व त्यासाठी भजनाची गोडी अखंड अभ्यासावी लागते. ज्ञानोबा माऊली म्हणतात “माझीया जिवीची आवडी पंढरपूरा नेईल गुढी” अशी जिवीची आवड भगवंताविषयी वाटावी लागते.

पण प्रत्यक्ष अनुभव वेगळाच येतो. अचानक दुःख पुढे येऊन उभे राहिले की मनाच्या तोल जातो. त्यात संतुष्ट बिघडते. प्रसन्नता राहात नाही. व्यग्रता येते. आपण अस्थिर होतो. भजन संपते. सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या गावी दुष्काळ होता. पिकांची पूर्ण हानी झाली. माणसं उपाशी राहू लागली. व्यापार बसला. मुलाबाळांना अन्न मिळेना. पत्नी रागवू लागली, तुम्ही विठोबाचे भजन करता तो काय देतो? तरीही महाराजांचा निश्चय ढळला नाही “एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई चा पती” हा निर्धार कायम राहिला. आपले भजन, श्रवण मास किंवा चातुर्मास संपला की संपते.

याला कारण आपले चित्त निश्चिंत नसते. सुनिश्चित नसते.अशा चित्ताने मन एकाग्र होत नाही. धीर होत नाही मग कर्म ही नीट होत नाही व भक्ती ही संभवत नाही. आपण भक्तीच रहस्य असं की, “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण”. चित्तात संतोष असेल व मन प्रसन्न असेल तरच भजन संभवते व ते इतके परिणामकारक ठरू शकते की ब्रह्मरूप काया होतसे. कीर्तनी सर्व काया ब्रह्ममय होते.

पण सर्वसामान्यपणे दुःखात भजन होत नाही. हे स्वाभाविक आहे. माळ जपतानाही मन फिरत राहते हा अनुभव आहे व आपलं मन ही फिरते. वृत्ती स्थिर व्हायला हव्यात. किंबहुना हव्यात हे अवघड असतं. आपण नकळत या मनाचे गुलाम होतो. वर खाली कोलांट्याउड्या घेतो. भोवरा जसा फिरतो तसे ते आपल्याला फिरवते व आपल्याला हिता पासून दूर नेते.

उत्तम शिक्षण, नोकरी, अलिशान बंगला, नोकर-चाकर, गाडी म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता, पण हे हित नाही. हित म्हणजे स्वहित, आत्मदर्शन हे जीवनाचं ध्येय असावं. श्रीरामाची सेवा गोंदवलेकर महाराज यांच्या हातून संपन्न झाली त्यांच्याकडे अपरिमित समाधान होतं. ते का संसारी नव्हते? पण त्यांचा बोध पक्का होता. “दाता राम सुखाचा I संसारा मान तु प्रभू सेवा II”.

असा भाव विचाराने-विवेकाने निर्माण होऊ शकतो. पण समर्थ पुढे प्रश्न करतात, अरे हे सोपं खरं पण इतके अवघड कसे काय झाले? तर “परमकठिण देही देहबुद्धी कळेना”

‘देहच मी’ हा संस्कार सगळ्यात दृढ झाला आहे व काळाची गरज ही बनली आहे. तो जन्मा- जन्मीचा असतो. त्याला या जन्मी आपण पुन्हा खतपाणी घालतो. ते रोपट चांगलंच बाळसं धरतं. पूर्वीची पिढी आजची पिढी यातला फरक एका साध्या उदाहरणावरून लक्षात येईल. लहान मूल पडले व त्याला खरचटले तर त्या जागीचीच माती व पाणी त्याला लावत. आता डेटॉल कापसा पासून सारं व्यवस्थित लागते.नाही केलं तर वेडेपणा म्हणतील आणि ते सत्यही आहे कारण इन्फेक्शन हा जबरदस्त शत्रू झाला. अशी हि देहबुद्धी कठीण नाही तर परम कठीण होते. चार रूमचा फ्लॅट व चार माणसं असली तरी प्रत्येकाचा वेगळा टीव्ही, एक वेगळा संगणक आता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संगणक नाकारता येणार नाही. काळाची गरजही असेल पण तरीही ही देहबुद्धी थोडी कमी करण्यासाठी आपण संतांची संगती करूया. त्यातच आपले खरे हित आहे.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.