उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

0

 

लोकशाही संपादकीय विशेष

 

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड कंपनीचे संस्थापक कै. आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर पाचोरा येथे त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेच्या आधीच सभा वादळी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात जे 40 शिवसेनेचे आमदार सामील झाले होते, त्यात सर्वाधिक पाच आमदार जळगाव जिल्ह्याचे आहेत, हे विशेष. बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक असलेले कै. आर ओ तात्या पाटील यांचेवर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. “एक टपरीवाला आमदार आणि मंत्री झाला आहे, ते केवळ कै. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच” असे वारंवार सांगणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा शिंदे यांच्या बंडात सामील होऊन शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची गद्दारी केली. यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर घणाघात केला जातोय. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेचे मुख्य खासदार संजय राऊत हे गुलाबराव पाटलांवर जहरी टीका करतात. पाचोरा येथील उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात वक्तव्य केले तर मी सभेत घुसून जाईन, असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटलांनी केला. त्यानंतर गुलाबराव पाटील सभेत घुसले तर ते परतच जाऊ शकणार नाही, अशी आमची तयारी असल्याचा खोचक टोला खासदार राऊतांनी मारला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेच्या आधीच सभा वादळी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौरा गाजला होता. आदित्य ठाकरेच्या सभेला उदंड असा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा जळगाव दौरा अर्थात प्रबोधन यात्रा गाजली. शिवसेनेच्या जिल्ह्यातील पाचही आमदारांना सुषमा आमदारांनी कडकडून टीका केली होती. त्यावेळी सुषमा अंधारे यांचेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेली टीका विशेषतः त्यांना दिलेली नटीची उपमा आणि गुलाबरावांचे ते वक्तव्य महाराष्ट्रभर गाजले. त्यात गुलाबराव पाटील बॅकफूटवर गेले होते. कारण त्याआधी जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची हेमामालिनीच्या गालाशी तुलना केली होती. गुलाबरावांनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आणि त्यानंतर त्यांची माफी मागावी लागली. त्यानंतर सुषमा अंधारेंवर केलेली टीका त्यांना भोवले.

 

जळगाव जिल्ह्यातील फुटलेल्या पाच आमदारांपैकी मंत्री गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे टार्गेट असल्याचे कळते. कारण गुलाबराव पाटील शिवसेनेशी गद्दारी करतील अशी बाब जिल्ह्यातील तसेच जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य शिवसैनिकांना रुचली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांचे विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ‘उद्धव ठाकरे जाहीर सभेत काय बोलतील?’ याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना केवळ कै. आर ओ तात्या पाटलांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेचे आमदार म्हणून ते निवडून आले. परंतु किशोर पाटलांनी शिवसेनेशी केलेली गद्दारी खुद्द त्यांची चुलत बहीण आणि कै. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना आवडली नाही. त्यामुळे कै. आर ओ तात्या पाटील यांचे वारस स्वतःला म्हणवून घेण्याचा किशोर पाटलांचा अधिकार नाही, अशी टीका वैशाली सूर्यवंशी यांनी केल्याने आमदार किशोर पाटील एकाकी पडले आहेत. त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने आमदार किशोर पाटलांच्या विरोधात कै. आर ओ तात्या पाटील यांच्या कन्या सौ वैशाली सूर्यवंशीला आमदारकीच्या निवड नक्कीच पगडा पर्याय उभा केला जात आहे. कै. आर ओ पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले असून दुसऱ्या दिवशी कै. आरोप पाटील यांच्या पुतळ्यासमोर जाऊन समर्थक कार्यकर्त्यांसह त्यांना अभिवादन करून आशीर्वाद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. कै. आर ओ तात्या पाटील हे माझे राजकीय वडील असल्याचे सांगून आमदार किशोर पाटलांकडून सद्बुद्धीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.