जळगाव शहराची नामुष्की थांबवा

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

सुवर्णनगरी जळगाव, दालनगरी जळगाव, व्यापार नगरी जळगाव, चटई नगरी जळगाव, पाईप नगरी जळगाव, कवितेची नगरी जळगाव, साहित्य नगरी जळगाव आदींबाबत अभिमानाने जळगाव शहराचा उल्लेखाबरोबरच व्यापारी संकुलाची नगरी जळगाव शहराला संबोधण्यात येत असले तरी आज शहराच्या संदर्भात जी हेळसांड चालू आहे त्याला जबाबदार कोण? आज जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्याची जागतिक गिनीज बुकात नोंद करावी अशी झाली आहे. कायमस्वरूपी नियमित पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. ज्या संथगतीने हे काम चालू आहे त्यामुळे जळगावकरांना पिण्याचे पाणी मिळण्यासंदर्भात अनियमितता तेला तोंड द्यावे लागते आहे. एकट्या जळगाव शहरातच अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे, आणि ते कितीतरी कठीण आणि गंभीर आहे! यामुळे महापालिका प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. अमृत पाणीपुरवठा योजनेचे नाव पुढे करून रस्त्यांची चाळण झाल्याचे कारण दिले जाते. दोन महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाकडून जळगावच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाल्याचा गाजावाजा राजकीय नेते मंडळी यांनी केला. पावसाळ्याच्या आत जळगाव शहरातील 23 भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे चकाचक होतील, अशा घोषणा झाल्या. तीन महिने केव्हाच संपले. आता पावसाळा सुरू होऊन मृगाचे पंधरा दिवसही कोरडे गेले पण सिमेंटच्या रस्त्यांना मुहूर्त काही सापडलाच नाही. आता कुठे १०० पैकी ५० कोटी रुपये आले. पण अंतिम यादीत निविदा अडकला असल्याचे सांगण्यात येते. ही कुठली कामाची पद्धत आहे, हे सर्वसामान्यांच्या समजण्याच्या पलीकडचे आहे. पालिकेची महासभा होते त्यात विकास कामांच्या मुद्द्यावरील चर्चेपेक्षा एकमेकांचे हेवे दावे आणि एखाद्या उखाड्या पाखाड्या काढण्याच्या चर्चेत वेळ जातो. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, नगरसेवक जनतेच्या प्रति असलेल्या कर्तव्याला पारखे होत नाहीत परंतु त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. राज्यकर्ते मंडळी अर्थात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकाच माळेचे मणी आहेत, असा आता समज होत चालला आहे. प्रत्येक जण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचा निम्मा कापूस अद्याप घरात पडून आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून भव्य शिंगाडा मोर्चाने जिल्हा हादरवून सोडणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील सत्तेत असल्यामुळे ब्र शब्दही बोलत नाही. शिवसेनेच्या स्थापना दिनी जागतिक कीर्तीचे भाषण करणारे गुलाबराव पाटील जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज काढत नाहीत हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल…

 

जळगाव शहर राहणे योग्य आहे काय? अशा प्रकारचे प्रश्न आता जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत याचा अर्थ या शहराला कोणी वाली नाही काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पाच वर्षांपूर्वी आताचे पाणीपुरवठा व पालकमंत्री यांच्याकडे राज्यमंत्रीपद होते, तेव्हा हेच गुलाबराव जाहीरपणे म्हणायचे, “राज्यमंत्रीपद म्हणजे हाती चिडी मारायची बंदूक दिली आणि वाघाची शिकार करा असे म्हणण्या जोगे आहे. म्हणून आपल्याकडे असलेल्या राज्यमंत्रीपदाला काहीच अधिकार नाहीत, म्हणून विकास कामे होणे कठीण आहे..” असे बोलायचे. आता ते स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. तरीसुद्धा स्वतःच्या पाळधी गावात आणि धरणगाव या त्यांच्या मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी वीस दिवसाआड नळाला पाणी मिळते. याचे कारण काय? पाण्यासाठी धरणगावकरांना हंडे मोर्चा काढावा लागत आहे. एकंदरीत आमचे लोकप्रतिनिधी त्याला जबाबदार आहेत. एकेकाळी राजकीय द्वेषातून जळगावचे नाव सेक्स कॅण्डलचे जळगाव म्हणून बदनामी केली गेली. त्याचे समाजा मनावर झालेले परिणाम कितीतरी दिवस जाणवत राहिले. आता समृद्ध अशा जळगाव शहराची विकासाच्या नावाने बोंबाबोंब करून जळगाव शहर बदनाम होत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील उद्योग, धंदे यांच्यावर वाढीव परिणाम होतोय. जळगावच्या विमानतळाचा विस्तार करून कायमस्वरूपी विमानाची नियमित सेवा सुरू झाली तर सुप्रसिद्ध अजिंठा लेणी साठी पर्यटक वाढतील आणि त्यातून जळगाव शहराचा व्यापार, उद्योग वाढण्यासाठी मदत होईल. या दृष्टीने विचारच होत नाही. रस्ते, महामार्ग आणि रेल्वे मार्गाच्या मुख्य लाईनवर असलेल्या जळगाव शहरातून ४८ तासात भारताच्या कानाकोपऱ्यात जाता येता येते. या सर्व सुख सोयींच्या योग्य फायदा घेण्यासाठी स्वार्थी राजकारण बाजूला सारले तरच जळगाव शहर पुन्हा नावा रुपाला येऊ शकते. पण त्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.