आंतरराष्ट्रीय योग दिवस; योगासने आणि त्यांचे महत्व

0

लोकशाही विशेष लेख

सध्याच्या युगात आपल्या सर्वांची जीवनशैली खूप बदलली आहे. धकाधकीचे आयुष्य, बदललेला आहार विहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक ताण तणाव व्यसनाधीनता, जंक फूड, रात्रीची जागरणे, सकाळी उशिरा उठणे तसेच सततचे बैठे काम या सगळ्यांमुळे आरोग्य खालावले आहे. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब,स्थूलता, हार्मोनल असंतुलन, सांध्यांची झीज, पचनाचे विकार असे अनेक व्याधी सध्या आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्यांपासून मुक्तता हवी असेल तर योगाभ्यास याला पर्याय नाही. योगाभ्यास योग ही आपल्या भारताची संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. योग हा शब्द या संस्कृत पासून बनला आहे. म्हणजे ‘जोडणे’ याचा अर्थ नेमका काय तर ‘योग’.. म्हणजे शरीराला मनाशी मनाला आत्म्याशी व आत्म्याला परमात्माशी जोडणे होय. संपूर्ण सृष्टी ही जशी पंचमहाभूतांपासून बनली आहे, तसेच आपले शरीर ही पंचमहाभूतांपासूनच बनले आहे. आणि पंच ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला त्याचे अर्थ कळतात. म्हणजे गंध, रस, रुप, स्पर्श व शब्द यांचे ज्ञान होते. या सगळ्यांचा एकत्र ताळमेळ साधने आणि त्यांनी एकत्रितपणे काम करणे म्हणजेच योग होय.

महर्षी पतंजलींनी योगसूत्र या ग्रंथात अष्टांग योग म्हणजेच योगाची आठ अंगे सांगितली आहेत. बऱ्याच लोकांना फक्त शारीरिक व्यायाम किंवा प्राणायाम म्हणजे योग असे वाटत असते. तर योगाचा अर्थ इतका साधारण नाहीये. योगशास्त्र हे खूप मोठे आहे. योगाची जी ‘अंग’ सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी यातील पहिली पाच अंगे. म्हणजेच यम पासून प्रत्याहार पर्यंत यांना ‘बहिरंग योग’ असे म्हटले जाते. यामुळे सामाजिक, वैयक्तिक, शारीरिक, प्राणिक व इंद्रिय गत शुद्धी होते. तर धारणा, ध्यान व समाधी यांना ‘अंतरंग योग’ असे म्हटले जाते. यामुळे आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि जे खरे योगी आहेत, जे खरे योग साधक आहेत ते हळूहळू प्रयत्नपूर्वक, निष्ठापूर्वक नियम आदींचे पालन करून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतात. त्यासाठी खूप संयमाची आवश्यकता आहे. तसेच अंतरंग व बहिरंग योग ही नेहमी एकमेकांच्या आश्रित असतात.

पहिले अंग : यम

म्हणजे समाजात आपला वावर कसा असावा. सामाजिक नियमांचे पालन करून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे म्हणजेच ‘यम’ होय.

दुसरे अंग : नियम

म्हणजे वैयक्तिक शुद्धी कशी करावी, निरोगी जीवन व अध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक सवयी स्वतःला कशा लावाव्यात याचे ज्ञान म्हणजे ‘नियम’ होय.

तिसरे अंग : आसन

म्हणजे फक्त योगासन किंवा वेगळ्यावेगळ्या पोजेस नाहीत. महर्षी पतंजलींनी आसनाची व्याख्या ही ‘स्थिरं सुखम आसनम’ अशी केलेली आहे. म्हणजेच ज्या स्थितीत तुम्ही सुखपूर्वक जास्त काळ स्थिर बसू शकतात, ते आसन होय. आसनांचे अनेक प्रकार आहेत.

चौथे अंग : प्राणायाम

प्राणायाम म्हणजे काय प्राण म्हणजे आपली जीवनशक्ती आणि आयाम म्हणजेच विस्तार किंवा नियंत्रित करणे, तर प्राणायामामुळे श्वासोच्छवासाच्या गतीवर नियंत्रण करता येते. प्राणशक्तीवर नियंत्रण करता येते. त्यामुळे आपले श्वासन लयबद्ध होते आणि त्यामुळे आपली प्राण शक्ती वाढते.

पाचवे अंग : प्रत्याहार

प्रत्याहार म्हणजे ‘इंद्रिय संयम’. आपल्याला बऱ्याच गोष्टींचा मोह होत असतो. अर्थात त्यामुळे आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडते. म्हणून इंद्रिय संयम हा कायमच आवश्यक आहे. प्रत्याहार हा बहिरंग योग व अंतरंग योग यांना जोडणारा दुवा आहे, ब्रिज आहे. इंद्रियांवर नियंत्रण मिळवले की, पुढील गोष्टी सहज सोप्या होतात.

सातवे अंग : धारणा

धारणा म्हणजे एका विशिष्ट अंतरिक किंवा बाह्य विषय किंवा बिंदूवर लक्ष केंद्रित करणे. अवचित एकाग्रता म्हणजे धारणा होय. याला सतत सरावाची गरज असते. म्हणजेच मेडिटेशन धारणेची अवस्था सुरू राहणे. संपूर्ण एकाग्रतेने केलेली जागृता अवस्थेतील विश्रांती म्हणजे ध्यान होय. यात मन मात्र सावधानी एकाग्र असते.

आठवे अंग : समाधी

समाधी म्हणजेच ध्यानाची अतिउच्च अवस्था आनंददायी अवस्था. ज्यामुळे आपली आत्मज्ञान प्राप्तीकडे प्रगती होते. या आठही अंगांचा सराव केल्याने अनेक फायदे होताना दिसतात योग हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मानव जातीसाठी वरदान आहे.

योगाभ्यासामुळे संपूर्ण शरीराचा आणि मनाचाही व्यायाम होतो. याचे फायदे अनेक आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीराचा स्टॅमिना वाढतो, शरीर निरोगी व मजबूत होते, स्नायूंना बळ मिळते, शरीराची लवचिकता वाढते आणि शरीर सशक्त होते. तसेच शरीराची ठेवण म्हणजेच पोश्चर सुधारते. योगासनांच्या अभ्यासामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे स्थूलता कमी होते आणि शरीरात उत्साह वाढतो आणि ऊर्जाही वाढते. अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते. त्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन, मधुमेह, थायरॉईड, पीसीओडी यासारखे आजार आटोक्यात येतात. त्वचा तजेलदार होते. पचनक्रिया सुधारते. मलाचे अनुलोमन चांगले होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन, ऍसिडिटी हे सगळे कमी होतात. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकले जातात.

प्राणायामामुळे श्वासगती नियंत्रित होते. शरीरातील प्रत्येक पेशीला मुबलक प्राणवायूचा पुरवठा होतो. रक्ताभिसरण सुधारते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, अस्थमा, अॅलर्जी यासारखे आजार बरे होतात. शरीरातील विविध प्रकारच्या ज्या नाडी आहेत, त्यांची शुद्धी होते. मनात येणारे विचार कमी होऊन मन निश्चल होण्यास मदत होते. धारणा, ध्यान यामुळे ताण तणाव कमी होतात. मन शांत, आनंदी व प्रसन्न होते. त्यामुळे आंतरिक शांतता आणि समाधान मिळते. स्मरणशक्ती सुधारते, अंतर्ज्ञानात वाढ होते आणि सजगता वाढते. नातेसंबंधातही सुधारणा होते. ऊर्जा शक्ती वाढून उत्साह वाढतो. काम करण्याचा हुरुप येतो. आळस दूर होतो. शारीरिक मानसिक अध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर प्रगती होऊन आरोग्य प्राप्ती होते.

आसन करताना काही काळजी घ्यावी लागते. प्रत्येक आसन करताना काळजीपूर्वक करावे. सकाळी लवकर उठून प्रातःविधी झाल्यावर रिकाम्या पोटी योग करावा. संध्याकाळी असं करायचे असल्यास जेवणानंतर तीन ते चार तासांचा गॅप हवा. पचन व्यवस्थित झालेले असावे. आसन नेहमी मोकळ्या आणि प्रसन्न वातावरणात करावे. आसन करताना अति पाणी पिऊ नये. मॅट किंवा चटई जरूर वापरावी. सुरुवातीला योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच आसने करावीत. एकदम अति जास्त ताण देऊन योग्य अभ्यास करू नये. प्रत्येक आसन करताना श्वास कधी सोडायचा, कधी घ्यायचा हे नियम नक्की पाळावेत. श्वास धरून ठेवू नये. शेवटी शवासन करून संपूर्ण शरीराचे शिथलीकरण अवश्य करावे. गर्भवती स्त्रिया तसेच वृद्ध आणि इतर कोणतीही शारीरिक व्याधी असल्यास योगशिक्षकांचे मार्गदर्शन घेऊनच आसने करावीत. स्वतःच्या मनाने कोणतेही आसन करू नये.

हे सर्व नियम पाळून योग्य रीतीने योगाभ्यास केल्याने संपूर्णरित्या आरोग्याची प्राप्ती निश्चितच होईल त्यामुळे आजपासून सगळ्यांनी योगाभ्यास नियमितपणे करावा.

डॉ लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य, पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ, पुणे
9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.