ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; विजेंदर सिंग

0

लोकशाही, विशेष लेख

विजेंदर सिंग (Vijender Singh) यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९८५ साली हरियाणातील भिवानी शहराजवळील कालवास या छोट्याश्या खेड्यात झाला. त्यांनी आपला मोठा भाऊ मनोज याला मुष्टियुद्धातील राज्यस्तरीय पदक विजेत्या कामगिरीमुळे भारतीय लष्करात नोकरी मिळाल्याचे पाहिले आणि हीच प्रेरणा घेऊन बालवयातच क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचे बालपण जन्मगावीच गेले, मात्र नंतर ते शालेय शिक्षण व प्रशिक्षणासाठी भिवानी येथे गेले. तेथील क्रीडा प्राधिकरणाच्या बॉक्सिंग क्लबमध्ये त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. तेथे सुरुवातीपासूनच जगदीश सिंग हे त्यांचे प्रशिक्षक होते. त्यांनी या मुलामधील कौशल्य हेरून विविध स्पर्धांसाठी तयार केले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये विजय संपादन केल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यांना मॉडेलिंग साठी संधी मिळू लागल्या. त्यांचे वडील हे बस चालक होते आणि घराची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे या मॉडेलिंग क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांना बॉक्सिंगचे प्रगत प्रशिक्षण सुरु ठेवणे शक्य झाले.

त्यांनी गुरुबक्षसिंग संधू यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. कनिष्ट गटातील खेळाडू असून देखील २००३ सालच्या आफ्रो-आशियाई स्पर्धेसाठी (Afro-Asian competition) त्यांची निवड करण्यात आली. त्या स्पर्धेत रौप्य पदक (Silver Medal) जिंकून त्यांनी आपली निवड सार्थ ठरवली. ते मध्यम वजनाच्या गटात सहभागी होतात. २००६ सालच्या दोहा, कतार येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांना कांस्य पदक मिळाले आणि त्यामुळे २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Beijing Olympic Games) ते पात्र ठरले. याच ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकले, भारतासाठी मुष्टीयुद्ध क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारे ते पहिले खेळाडू आहेत. २०१५ सालापासून त्यांनी व्यावसायिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, विजेंदर सिंग यांना २००६ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) आणि २०१० मध्ये पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी, जळगाव
संपर्क : ७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.