लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अद्याप सामसूम !

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने जिल्ह्याभरात प्रचारासाठी अद्याप पर्यंत सामसूम दिसून येत आहे. येत्या ५ एप्रिलला महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रचार वेग घेईल. दरम्यान जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून जिल्हाभरात प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. दोन्ही बाजूच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत मतदार संघातील जाहीर झालेले उमेदवार कदाचित बदलण्याच्या शक्यते संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याचे संदर्भात दबाव तंत्र वापरले जात असल्याचेही बोलले जाते आहे.

पारोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे मूळचे भाजपचे कट्टर कार्यकर्ते समजले जातात. परंतु जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांवर उमेदवार म्हणून नाव पुढे आले आहे. कारण पवार यांचे क्षेत्र वास्तविक पारोळा शहरापुरते मर्यादित असताना लोकसभेच्या निवडणुकीसाठी तेही शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होणे, याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयार आहोत. यावेळी आपल्या नावाचा विचार व्हावा, असे त्या मागचे दबाव तंत्र म्हणता येईल. परंतु भाजपचे उमेदवार घोषित झाले असताना स्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे, हेच मुळात चुकीचे आहे. अशावेळी पक्षातर्फे या कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करायला हवी. परंतु अलीकडे प्रत्येक पक्षाला कार्यकर्ते सांभाळावे लागत आहेत. म्हणून कारवाईचा बडगा दाखवला जात नाही.

जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या आढावा बैठकीत भाजपचे मंत्री संकट मोचन गिरीश महाजन यांच्यासमोर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तू-तू.. मै-मै.. झाली. खासदार रक्षा खडसे यांना जोरजोरात खडे बोल सुनावले गेले. रक्षा खडसेंच्या गाडीत तुतारीचे कार्यकर्ते असतात. हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. अशी तक्रार मंत्री गिरीश महाजनांकडे करण्यात आली. कोअर कमिटीच्या सभेतील हा वादाचा व्हिडिओ जिल्हाभरात व्हायरल झाला.

कोअर कमिटीच्या गुप्त बैठकीतील हा व्हिडिओ व्हायरल झालाच कसा? हे करण्यामागचे षडयंत्र काय? असे विविध प्रयत्न प्रश्न निर्माण झाले आहेत. अर्थात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू आहेत काय? असा सवाल भाजप तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे. त्याचा सुद्धा परिणाम मतदार संघातील प्रचारावर दिसून येत आहे. भाजपवर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्याचबरोबर अलीकडे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षाविषयी निष्ठा राहिलेल्या दिसून येत नाही. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोणत्याही क्षणी कोणतेही कार्यकर्ते आणि नेते पक्षप्रवेश करू शकतात. त्यामुळे सर्व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. आचारसंहिता लागू झाली. परंतु अजून मोठे नेते भाजप परतू इच्छितात असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगून विरोधी पक्षाची हवाच काढून घेतली. तसेच विरोधी पक्षाकडे आता काही शिल्लकच उरले नाही, अशी खिल्ली उडवण्यात येत आहे. त्यामुळे सुद्धा लोकसभा निवडणूक प्रचारात सामसूम आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

राजकारणाच्या या बजबजपुरीमुळे तसेच प्रत्यक्ष पक्षातील गटबाजीमुळे पक्षनिष्ठा राहिलेली नाही. त्यामुळे अद्याप तरी भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला जातोय. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा आता मागे पडून इलेक्ट्रॉल  बॉण्ड तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवालांची अटक हे मुद्देच चर्चेले जात आहेत. त्यामुळे सुद्धा निवडणूक प्रचार थंड बस्त्यात पडून आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.