इंद्रियांवर नियंत्रण ठेवून जन्म-मरणाच्या फेऱ्या टाळा

0

प्रवचन सारांश – 16.09. 2022

पाच इंद्रियांच्या विषयांमध्ये न गुंतता राग, द्वेष यापासून साधक स्वतःला दूर ठेऊन आत्म्याची उन्नती साध्य करू शकतो असा आत्मविश्वास पू. जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून निर्माण केला.

क्रोधावर नियंत्रण मिळविण्यासाठी नीतिकारांनी काही उपाय सांगितलेले आहेत. त्यामध्ये अनेकांतवादाचे चिंतन करा, क्रोध केल्याने दुर्गती होते हे नेहमीसाठी ध्यानात ठेवा. ज्याठिकाणी क्रोध निर्माण होतो त्या ठिकाणाला बदला, तेथून दूर निघून जा. तुम्ही क्रोधाला क्रोधाने उत्तर दिले तर जास्तच क्रोध निर्माण होतो. क्रोध आल्यावर मौन ठेवा, लगेच काहीही प्रतिक्रिया व्यक्त करायला नको, एका क्षणाच्या क्रोधामुळे प्रचंड नुकसान होते असे अनेक उदाहरणे जगात आहेत. क्रोधाच्या वेळी शुभ विचार मनात आणावे. ‘मेरी भावना’ ह्या रचनेत क्रोधावर नियंत्रण कसे मिळवावे हे उत्तम प्रकारे सांगितले आहे, असे मोलाचे विचार आजच्या प्रवचनात सांगण्यात आले. अनुप्पेहाध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी मेरी भावना या रचनेवर आधारीत प्रवचन केले.

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री. पू. पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे. त्यात ‘आराम शास्त्र’ व ‘मेरी भावना’ या विषयांवर दैनंदिन प्रवचन मालिका सुरू आहे. ज्ञानाच्या चार गोष्टींचे चिंतन करण्याची संधी यानिमित्त श्रावक-श्राविकांना मिळते.

आजच्या प्रवचनात जयधुरंदर मुनी यांनी आगम शास्त्रावर आधारीत प्रवचनात सांगितले की, ‘सिद्ध अरिहंत में मन रमाते चलो !’ विष व विषय याबद्दल सांगितले. पाच इंद्रियरूपी घोडे उधळले तर सारथी कितीही निष्णात असला तरी तो निष्प्रभ ठरतो. इंद्रियांचे आपल्यावर नियंत्रण नको, इंद्रियांवर आपले नियंत्रण असावे. याबाबत त्यांनी सुंदर उदाहरण दिले. कैद्याला घेऊन जाणारे पोलीस आणि नेत्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस यांच्यात फरक आहे. कैद्यावर पोलीसांचे नियंत्रण असते व नेत्याचे पोलीसांवर नियंत्रण असते. नेता सांगेल तसे पोलीसाला करावे लागते.

जन्म-मरणाच्या फेऱ्यातून वाचायचे असेल तर आपले इंद्रियांवर नियंत्रण असावे असा मोलाचा सल्ला प्रवचनातून दिला गेला. ‘स्पर्शेंद्रीय’ प्रत्येक जीवाला प्राप्त झालेले आहे. मृदु, मुलायम, कोमल स्पर्श प्रत्येक जीवास हवा हवासा वाटतो. स्पर्शेंद्रीयामुळे राग, द्वेष आसक्ती निर्माण होऊन आत्मा कर्मबंधात अडकतो. त्यामुळे इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे असे प्रवचनातून सांगण्यात आले. उद्यापासून 17 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या ११ गणधर की साधना यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील आजच्या प्रवचनातून करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.