त्वरित उपाय योजना करा… आ.चिमणराव पाटीलांकडून महावितरणाची कानउघाडणी

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गेल्या ८ ते १० दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु असून, ऐन नवरात्रीच्या उंबरठ्यावर दिवस रात्र न बघता तब्बल १५ ते २० वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. यामुळे घरांमधील विद्युत उपकरणे विजेच्या कमी जास्त दाबामुळे नादुरुस्त होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी व्यत्यय येत आहे.

दरम्यान पारोळा शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. एखाद्या भागाला पाणी आले कि तेथील वीज बंद पडते. यामुळे अनेकांना पाणी देखील मिळत नाही. यामुळे शहरवासीयांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे शहरवासीय, शेतकरी यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाल्याने, याची दखल एरंडोल – पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी घेत, तातडीने बैठक बैठक बोलावली. या सदर बैठकीला पाचोरा कार्यकारी अभियंता आर.जे.चव्हाण, उपकार्यकारी अभियंता पी.एम.पाटील, शहर अभियंता जी.एस.मोरे, पारोळा ग्रामीण – १ अभियंता रजनीश श्रॉफ, पारोळा ग्रामीण – २ अभियंता सचिन बागुल, मंगरूळ कक्ष अभियंता अनुजय धर्माधिकारी, मोहाडी कक्ष अभियंता निसार तडवी, तामसवाडी कक्ष अभियंता जे.पी.चव्हाण हे सर्व या बैठकीत उपस्थित होते.

बैठकीत आमदार चिमणराव पाटील यांनी महावितरण कडून नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा पाढाच वाचला. शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक महावितरणाच्या जाचाला वैतागले आहेत. येणाऱ्या काळात अनेक लहान मोठे सन आहेत. यात असाच त्रास सुरु राहिला तर नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागले. यासाठी काहीही कारणे न सांगता तातडीने उपाय योजना करा व नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने सोडवा अश्या सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी, पारोळा शहरातील विद्युत कनेक्शन असलेल्या रोहित्रावर ग्रामीण भागाचे देखील विद्युत कनेक्शन आहेत. ग्रामीण भागातून अथवा शहरातून एकाचवेळी अतिरिक्त विद्युत भार पडल्याने रोहीत्रावरील कनेक्शन ट्रिपिंग होवून बंद पडतात. यावर उपाय योजनेसाठी आम्ही शहराची विद्युत कनेक्शन एकाच रोहित्रावर व ग्रामीण भागाची वेगळ्या रोहित्रावर कनेक्शन जोडणी करण्याचे काम पूर्ण केले असून, यापुढे हा त्रास पूर्णपणे कमी होईल. तसेच नगरपरिषदेमार्फत पाणी सोडण्यात आलेल्या भागात काळजीने लक्ष घालून विद्युत कनेक्शन बंद होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या सर्व विषयांसह इतर बाबतीत देखील महावितरण तर्फे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.