संत चरण रज सेवीता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय ||

0

संतांची आवडती भजने या हभप रंगनाथ महाराज खरात त्यांनी प्रकाशित केलेल्या सांप्रदायिक पुस्तकात संत सेवेचे महत्त्व तुकाराम महाराजांनी विशद केले आहे. संतांच्या पायाची धूळ मस्तकी लागली तरी पुण्य प्राप्त होते. अंतकरण शुद्ध होते. वासनेचे बीज जळून भस्म होते, असे तुकोबारायांनी म्हटले आहे.

राम राज्यात भगवान प्रभू रामचंद्रांनी सती अहिल्याचा उद्धार केला. प्रभू रामचंद्र भगवान मर्यादापुरुषोत्तम आहेत. माता अहिल्येला पती शापामुळे शिळा होऊन राहावे लागले. राम-लक्ष्मण व गुरु विश्वामित्र राजा जनक यांनी आयोजित केलेल्या सीता स्वयंवराला जात असताना मध्येच ऋषींच्या आश्रमाजवळ जवळून जाताना रामांच्या पायाचा स्पर्श त्याला झाला. त्यावेळी त्या शिळेतून सती अहिल्या शापमुक्त झाली, अशी रामायणात अख्यायिका आहे.

संत चरण रज सेवीता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय || मग काय होते. नंतर मानवाला एक वेगळीच अवस्था प्राप्त होते. मग रामनामे उपजे आवडी | गोडी लागते आणि जीवनात मग सुख घडोघडी वाढी लागे | आता या संक्रमण काळात संत कोणाला म्हणावे, हा खरा प्रश्न आहे. कधी उगाच लोकांनी संतांना देव करून टाकले आहे. देव अवतार घेतात त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. भगवान कृष्ण, भगवान राम, नरसिंह, वामन, आदी ते पंढरपूरला अठ्ठावीस युगापासून उभा आहे तो भक्त सखा पांडुरंग हे देव आहेत. मग संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, निळोबा, चोखोबा, गोरोबा, संतोबा, नामदेव महाराज, जनाबाई, कान्होपात्रा, संत कबीर विविध धर्माचे जाती पंथाचे संत मांदियाळीत आहेत. कलियुगात भ्रमित झालेल्या काही संतांनी आपला काल परत्वे महिमा सिद्ध केला. चमत्कार दाखवला त्याला संत म्हणावे का?

भक्तीच्या बळावर भगवंतालाही नमाविण्याचे अधिकारी म्हणजे संत. संत मुमुक्षु जणांना आपल्या विचारांनी, संगतीला घेऊन जे भगवंताच्या मार्गाकडे नेतात ते संत. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणून यात मी शिरणार नाही. पण काय करणार? बुडविता जन न देखवेची डोळा | म्हणून काही बाबींविषयी स्पष्ट बोलणे हिताचे ठरते. अध्यात्म ज्ञानाची गफलत करून माझा जो इष्ट देव आहे त्याला सर्वांनी मानले पाहिजे, भजले पूजले पाहिजे, असे काहींना वाटते. मी एक संत पाहिले ते एअर कंडिशनर मध्ये राहतात, उंची बीएमडब्ल्यू सारखी गाडी त्यांच्या दिमतीला असते. त्या गाडीला भक्त रथ म्हणतात. भारी वस्त्रे, भक्तांनी देश-विदेशातून भेटवस्तू म्हणून दिलेल्या मौल्यवान अंगभर वस्तू, मग हे संत प्रवचन करतात.

ट्रस्ट व गोशाळेच्या नावाने भक्तांच्या माध्यमातून लाखोंच्या देणग्या मिळवतात. सात दिवसात रामायण, भागवत, देवी भागवत आणि चमकोगिरी म्हणून या महा गुरूंना चैनल वरून जगभर प्रसिद्धीही देतात. दोन तीन लाख रुपये चॅनलवाले घेतात. उर्वरित रक्कम कलाकारांच्या ट्रस्टमध्ये दान म्हणून जाते. हे कथाकार यांचे झाले. छोट्यामोठ्या आश्रमात राहून भक्तांनी आणलेला गांजा प्रसाद म्हणून स्वीकारणारे संतांचाही संप्रदाय फार मोठा आहे. काही कल्याण, वरळी मटकाचा आकडा ही काढून देतात. यामध्ये खरा निस्पृह, ज्ञानी, परिपूर्ण अभ्यासू, सन्मार्गाने चालणारा, सत्यार्थी मात्र उपेक्षित राहतो. जोपर्यंत खरा गुरु ओळखत नाही तोपर्यंत तरी पाखंडी, दुराचारी, अधम भोंदूबाबाचे चमत्कारांनी लोक भ्रमित होतच राहतील.

भेद ब्रह्म आटे आशापाश तुटे | विश्रांती हे भेटे संतसंगे ||
प्रेमी कंठ दाटे आनंदे पुर लोटे | हृदयी प्रकटे रामरूप ||

म्हणून संत हे रसायन स्वतः भगवंताने आपल्या हातून तयार केलेले आहे. त्यांच्या स्त्री मते जातीचा उद्धार होऊ शकतो तेथे मानव जातीची काय बिशाद…!

रमेश जे. पाटील
९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.