जीवन व्यवस्थापन विचार

0

गुणवत्तेचे व्यवस्थापन, वर्धन, ह्यासोबतच गुणवत्तेची हमी ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहचल्या त्या व्यवस्थापन शास्त्रातील विषय म्हणून पण व्यापक विचार करता ह्या सर्व गोष्टी मानवी जीवनालाही लागू होतात. व्यस्थापन शास्त्रातील गुणवत्ता ही वस्तू व सेवा यांच्या गुणवत्तेसंदर्भात अपेक्षित होती किंवा आहे तर जीवनाची गुणवत्ता हा विषय फार व्यापक व अनेक कंगोरे असणारा आहे. पण तरीही संपूर्ण मानवी जीवनाची एकंदरीतच आजची परिस्थिती पाहता गुणवत्ता सुधारावर विचार करावा अशीच परिस्थिती आहे. आपली जीवन पद्धती त्यात आपण निर्माण करीत असलेली किंवा आपल्या आचार, विचारातून, व्यवहारातून प्रतिबिबित होणारी आपली गुणवत्ता ज्यांनी आपल्या जीवनाचा पोत वरच्या पातळीवरचा असावा अशी आपली आंतरिक इच्छा किंवा तळमळ असते ती प्रतीत होते किंवा नाही हे सातत्याने ,कटाक्षाने व निग्रहाने बघणे व या बाबतीत जागरूकपणे सुधारणा घडविणे.

त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच जीवनाची गुणवत्ता सुधारणे केवळ गुणवत्ता सुधार हाच एक परिमाण म्हणून उपयोगी नाही तर जीवनाची सार्थकता नेमकी काय व आपली वाटचाल कोणत्या दिशेला आहे. याचाही आढावा घेतला पाहिजे म्हणजे जीवन मूल्यांचे महत्व हे लक्ष्यात येते सर्वच मूल्यांचे पालन करावे असे अपेक्षित असते, पण व्यवहारी जगताशी जीवनाची सांगड घालताना जेवढे अधिक शक्य होतील तेवढे मूल्याधिष्ठित जीवन जगावे असा जीवनसिद्धांत आहे या सिध्दांताच्या प्रमाणे किंवा जवळपास आपली जीवन पद्धती असावी व तीच कायम राहावी.

यासाठी प्रयत्न करणे हे जीवनाच्या व्यवस्थापनाचे मुख्य सूत्र आहे. ज्या प्रमाणे व्यवस्थापन शास्त्रात विविध व्यवस्थापन तज्ञांनी गुणवत्ता वर्धन, व व्यवस्थापन याचे धडे दिले, सिद्धांत मांडले, संकल्पना मांडल्या त्याच्या कित्येक वर्ष अगोदरच संत, महंत योगी, महात्मे, सिध्दपुरुष यांनी जीवन विषयक तत्वज्ञान मांडले त्याचा मूळ गाभाच मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारावी हाच आहे. जीवन जगण्याचा दृष्टिकोन उन्नत व्हावा हीच या सर्वांची तळमळ होती त्या अर्थाने ते सर्वच लोकशिक्षकच होते. मानवाचे कल्याण हा त्यांच्या प्रत्येक कृती आणि अभिव्यक्तीचा केंद्रबिंदू होता म्हणून त्यांचे सर्व शिक्षण शाळा अथवा महाविद्यालयात बंदिस्त न राहता समाजात आणि लोकांमध्ये रुजले या अर्थानेच समर्थ म्हणतात.

आपणासी जे ठावे।
ते इतरांशी शिकवावे।
शहाणे करुनि सोडावे सकळ जन॥

घरात, कुटुंबात, समाजात रुजविले जाणारे संस्कारक्षम धडे म्हणजे समाजच्या गुणवत्तेचे वर्धन करणे हे या शिक्षणात अभिप्रेत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची वैश्विक प्रार्थना म्हणजे पसायदान खऱ्या अर्थाने मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारावी यासाठीच आहे.

जे खळांची व्यंकटी सांडो।
त्या सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे जडो मैत्रंजिवाचें॥

माणसातील वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा व त्याची जागा सतप्रवृत्तींनी घ्यावी माणूस कायम राहून वृत्तीत फरक पडावा म्हणजेच जीवनाची गुणवत्ता वधारणे हाच आहे. माउलींनी अशीच प्रार्थना केली केवळ मानवच नव्हे तर समस्त प्राणिमात्रांचे जीवन उन्नत व्हावे व विश्वाने स्वधर्माचा सूर्य म्हणजे उषःकाल पहावा. ही उदात्त संकल्पना त्यांनी ठेवली व विश्वकल्याणाचा संदेश दिला. आज मानवी जीवनाची घसरण चारी बाजूनी होत असताना हे विचार रुजणे गरजेचे वाटते. प्रत्येकाने आपल्या जीवनाचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीत करावे व मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीकडे वाटचाल करावी. एवढाच बोध घ्यावा.

जय जय रामकृष्ण हरी

प्रा. नितीन मटकरी
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२९

 

Leave A Reply

Your email address will not be published.