सदा सर्वदा योग तूझा घडावा I तुझे कारणीं देह माझा पडावा II

0

करुणाष्टक- 26

सदा सर्वदा योग तूझा घडावा I
तुझे कारणीं देह माझा पडावा II
उपेक्षूं नको गूणवंता अनंता I रघुनायका मागणें हेचिं आतां II

समर्थांच्या करुणाष्टकातील ही आबाल वृद्धांमध्ये परिचित असणारी प्रार्थना व प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात देवापुढे एक मागणं मागुन त्याची सांगता करायची वर्षानुवर्षाची पद्धत. पण तिचा आशय व अर्थ त्याची खोली संपुर्ण जीवनाला व्यापून राहणारी अशीच. समर्थ मागणे मागतात रघुरायाला, “सदा सर्वदा योग तुझा घडावा”.

देहाचा व्यापार, मनाचा व्यापार, बुद्धीचा व्यापार व त्यामुळे होणारी कृती ही जेंव्हा भगवंतासाठी होते ती सत् कडे जाणारी असते. तेव्हाच ती भक्ती होते. तेव्हाच तो योग होतो. संत कबीर म्हणून जातात,” राम हमारा जप करे, हम बैठे आराम,” आजवर जे संत महात्मे होऊन गेले व त्यांचे जीवन चरित्र व त्यातील प्रत्येक घटना ही भगवंतप्राप्ती साठी, परमात्मा प्रित्यर्थच होती किंवा त्या भावांन- बोधान त्यांची साधना, समाजप्रबोधन किंबहुना ऐहिक प्रपंचही चाललेला होता. हातुन घडणारी नित्य कर्म, साधन कालातील साधना हे समर्पण बुद्धीने होई, निजानंदात रंगुन व कर्म कृष्णार्पण करून सर्वच संतांनी देवाची चरणसेवा साधली.

कोणत्याही कर्माला कमी लेखले नाही किंवा त्याच्याकडे पाठ फिरवली नाही. श्रीरंगानुजतनुज यांनी एक सुंदर भक्तिकाव्य रचले आहे व त्यात ही भक्तमंडळी देवाच्या महाद्वारी कशी उभे आहेत याचं वर्णन केले आहे ते म्हणतात,” प्रात:काल झालाय, देवा उठा, दर्शन द्या” नामदेव शिंपी तुमच्यासाठी अंगड टोपी घेऊन आलेत.तर नानापरीचे अलंकार देऊन नरहरी सोनार उभे राहिले. सावता माळी यांनी सुगंधी फुले आणली.टाळ मृदुंग घेऊन कान्होपात्रा नृत्य करत आले. माणकोजी बोधला देवासाठी लिंबुर हुरडा घेऊन आला. दुधा-तुपाची वाटी भरून तुझ्या मुखाला लावण्यासाठी मीराबाई लक्ष लावुन बसली आहे. तर नामदेवाची जनी तुला न्हाऊ घालण्यासाठी तेल, तुप घेऊन महाद्वारी तिष्ठत उभी आहे.

गुळ खोबरे भरुन गोणी घेऊन तुक्यावाणी आला आहे.”माय बाप जोहार” असा घोष करत चोखामेळा आलाय. ज्यांनी हरिभजन केले नाही ते नरदेहा येउन बैल झाले ते गोरा कुंभाराने खेळायला देवा तुझ्यासाठी आणलेत. अशा आशयाचे हे गीत सर्व कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने केल्याने ज्यांचा नुसताच उद्धार झाला नाही तर श्रेष्ठ संत म्हणुन गणले गेले. ह्याची पोचपावती देणारा हा अभंग आहे. म्हणुन समर्थांच मागणही “सदा सर्वदा योग तुझा घडावा” असे आहे. नरदेह लाभलेले घबाड आहे पण त्याचा उपयोग ही परमेश्वर प्राप्तीसाठी करून घ्यावा. देह परमार्थासाठी लावला तर त्याचे सार्थक होते. नाहीतर देहाची गती कशी? “नाहीतरी ते व्यर्थचि गेले नाना आघाते मृत्यूपंथे” अशी प्रत्येक दिवशी तो मृत्यूकडे चालला.शरीर ही कफ-वात- पित्त अस त्रिदोषांनी युक्त आहे. ती दोष प्रवृत्ती बळावली की, आधी-व्याधी आहेतच. शरीर नाना रोगांचे माहेर आहे. काहींना काही तक्रारी चालूच राहतात.वय वाढेल तशा वाढत जातात.

रामकृष्ण परमहंस म्हणत असत,”अरे! या देहाचे भाड द्याव लागत.कोणत्या रुपान? तर रोग -व्याधी,त्याच औषध- पाणी,पथ्य सार सांभाळावं लागतं आणि युक्त आहार विहारान तो युक्त ठेवला तरी एक दिवशी तो काळाचे भक्ष्य होणारच असतो.म्हणून समर्थ म्हणतात, “तुझे कारणी देह माझा पडावा” हा देह लाभला तर तो सर्व कार्यासाठी, भगवंतासाठी, समाजकार्यासाठी, देशकार्यासाठी कामी यावा. सज्जनांच्या संगतीत संतांच्या सहवासात या देह बुद्धीची आत्मबुद्धी व्हावी. दिवसाकाठी काही नियमीत वेळ उपासना करायची. सद्गुरुला शरण जायचं. आपला निश्चय दृढ राहण्यासाठी तप करायचे. बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ही सर्व मालिका असते. आपण हे सारे करायचे. काही अल्प प्रमाणात आपणही अनुभव घ्यायचा, “आनंदाचे डोही आनंद तरंग”.

त्यासाठी पुनश्च आपल्याला आधार हवाय,कृपाछत्र हवय ते ‘रामरायाचे’ .”उपेक्षु नको गुणवंता अनंता” आत्मदर्शन हे जीवनाचे ध्येय वाटुन त्यासाठी हातुन काही मार्गक्रमण होण्यासाठी ‘योग’च असावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संतश्रेष्ठ शिरोमणी असताना सारी आळंदी उध्दरुन गेली असती. पण तसे होत नाही कारण गीतेत सांगितले तसेच ‘ आश्चर्यवत् कश्चित ‘ एखादाच त्या परमपदाची प्राप्ती करून घेतो. महाराष्ट्रात जन्म घेऊनही ज्ञानेश्वरी, दासबोध सारखे ग्रंथ न वाचणारी मंडळी भेटतात.

स्वामी समर्थ म्हणतात ‘उपेक्षु नको’ तु आमची उपेक्षा करू नकोस आम्हाला दोष लावु नकोस तुझा महिमा व सामर्थ्य दोन्ही अगाध आहे. गुणांचा सागर असलेला तु आमचे अवगुण पोटाशी घे नाहीतर आमचे बालपण खेळण्यात, तरुण पण विषयांकडे धाव घेण्यात, वृद्धत्व चिंता व काळजी यात कसे संपुन जाईल हे सांगता येणार नाही. तुझी कृपादृष्टी आमच्यावर असू दे. हे माता- पिता , बंधु- भगिनी, पत्नी विद्या, पैसा, लौकिक, वैभव यात जर भगवत भजनाचा अभाव राहिला तर सारेच मातीमोलाचे ठरेल. हे रघुनायका आमचा मागणं तु पुर्ण कर. मनोकामना सफल कर. हा दास प्रतिक्षा करतोय.

IIजय जय रघुवीर समर्थ II
लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.