हे शिवपीठ शिवाचे | हेची पूर्वस्थान अगस्तीचे | असे क्षेत्र आळंदी

1

साक्षात भगवान भवानी शंकराच्या वास्तव्याने पुनीत व अगस्ती ऋषींसारख्या सिद्ध महामुनींची तपसामर्थ्याने पावन झालेली पुण्यशील पुण्यभूमी म्हणून नावाजलेली अलंकापुरी म्हणजेच आळंदी. या सर्व तिथींची आदीभूमी म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे.

आळंदी हे श्री निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरमाऊली, सोपानकाका व ब्रह्मवादिनी आदिशक्ती मुक्ताई यांचे जन्मस्थान आळंदीच्या पुरातन व ग्वाही साक्षात संत नामदेवांनी द्यावी. आपल्या गायेत त्यांनी म्हटले आहे.

हे शिवपीठ शिवाचे| हेची पूर्वस्थान अगस्तीचे |
सर्व क्षेत्राचे असे | आदिपीठ हे ||

कृतयुगात आळंदीला आनंदवन, त्रेतायुगात वारूण, द्वापारयुगात कपिल आणि कलियुगात हलका वनी अलंकापुरी असे नामाभिदान या क्षेत्राला पडले. प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा आपल्या धर्मसंस्कृतीने जपून ठेवल्या आहेत. पंढरी नवरीला जसे भूलोकीचे वैकुंठ म्हणतात तसं आळंदीला अलकापती हे पुराण प्रसिद्ध नाव आहे. अध्यात्म योगसंपन्न तपासामर्थ्याने ओतप्रोत ज्ञानसंपन्न अशा चारही भावंडांचा जन्म या क्षेत्रावर व्हावा हे त्यांच्या तप: पूत ज्ञानयज्ञमय जीवनाशी सुसंगत ठरते.

वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणी यांच्या पोटी जन्मलेले हे चारही योगी महात्मे येथे अविरत झाले. अंतर्बाह्य चैतन्याने रसनसलेली, निसर्गसौंदर्याने नटलेली व शांतीसुखाने निथळती असा आळंदीचा रम्य परिसर स्वानंद सुखाची आजही अनुभूती देतो.

आळंदीचे कुळकर्णीपण चालवणारे विठ्ठलपंत सत्वशील, सतशील धर्मप्रवण, वेद, उपनिषद, स्मृती पुराणे या आध्यात्मग्रंथांचे नित्य अध्ययन करणारे सिद्धोपंत येथे होते. गोरक्षनाथांचे शिष्य गहिणीनाथांची कृपा झाल्यावर सिद्धोपंतांनी गिरीजा बाई यांच्याशी विवाह केला. सिद्धोपंतांकडे दररोज नेमस्तपणे भजन, पूजन, पठण चालत असे, सर्व ग्रंथसंपदा त्यांच्याकडे होती. पंढरपूरचा विठोबा त्यांचे आद्यदैवत होते.

विठ्ठलपंतांचा आणि सिद्धोपंतांचा आळंदी येथे असतांना परिचय झाला. समविचारी, समानधर्मीय व
समपंथीयत्वामुळे त्यांचा दिवसागणिक स्नेहभाव वाढत गेला. विठ्ठलपंतांचे मूळ गाव आपेगाव होते पण आळंदी मुक्कामी सिद्धू पंतांकडे त्यांचा मुक्काम राहिला. अतिथी देवो भवः या भारतीय संस्कृतीनुरूप सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतचा मोठा आदरभाव केला.

चर्चा व अभ्यासातून विठ्ठलपंत ज्ञानी आहेत हे सिद्धोपंतांनी कळून चुकले होते. आपली कन्या रुक्मिणी सिद्धोपंतांना योग्य अनुरूप होईल हा विचार त्यांच्या मनात आला. भगवंताने सुयोग्य वर आपल्या कन्येसाठी पाठवून दिला आहे, या आंतरिक श्रद्धेने प्रेरित होऊन मग सिद्धोपंतांनी रुक्मिणीशी विवाह करण्याची विनंती केली. प्रपंच संसार व वैवाहिक जीवनाविषयी संपूर्ण उदासीन असल्यामुळे विठ्ठलपंत संभ्रमावस्थेत होते.

भक्ति ज्ञान वैराग्य आवडी । नसती उघडी तुझ्या अंगी ।

मूर्तीमंत चारी जन्म इच्या उदरी । म्हणोनी स्विकारी हे आज्ञा माझी ॥

हे नामदेव महाराजांनी आपल्या गायेतून हटले त्यानुसार आधी केले मग सांगितले. तसंच घडत गेलं.. दिव्य, श्रेष्ठ, गुण व तेज युक्त चार भावंडांविषयी सिद्धोपंतांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. विठ्ठलपंतांना केलेली आज्ञा माणून रुक्मिणी मातेनेही सहधर्मचारिणी म्हणून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. विठ्ठलपंत मुलतः अध्यात्म प्रवण व धार्मिक वृत्तीचे होते. संसारात त्यांचे मन रमेना. विरक्त वृत्ती परमार्थाकडे ओढा त्यांना अस्वस्थ करून सोडत होता… एक दिवस रुख्मिणीमाता अर्धवट झोपेत असतांना हो सावधपणे झोपेतच तिच्या तोंडून संन्यास घेण्याची अनुमती वदवून घेत विठ्ठलपंतांनी पेट काशी क्षेत्र गाठले.

काशीत विठ्ठलपंताना संन्यास दिशा देणारे अध्यात्मगुरु श्रीपादस्वामी यतीश्वर सेतुबंध रामेश्वर यात्रेसाठी आळंदीकडून जात असतांना खडतर व्रताचरण करणाऱ्या पतिव्रता रुक्मिणी मातेला पहाटे पहाटे इंद्रायणीतीरी सिध्देश्वर महादेवाच्या अस्वस्थ वृक्षास नित्यनेमाने प्रदक्षिणा घालीत असलेल्या रुख्मिणीने त्यांना पाहिले व तीने त्यांना पाहिले व तीने त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा स्वामींचे तोंडून ‘अष्ट पुत्र सौभाग्यवती भवः’ हा आशिर्वाद दिला. स्वामींनी आशिर्वाद तर दिला परंतू पती तर संन्यासी झाले आहेत. आनंदीत न होता रुख्मिणी खिन्न झाल्या. डोळ्यात टचकन पाणी आले, अंतःकरण द्रवित झाले, कंठ सद्गदित झाला. मुनिंना आपल्या पतीची सर्व हकिगत कथन केली ती सत्यस्थिती जाणताच स्वामींनी आपली यात्रा अर्धरेट सोडून काशीला परतले. त्यांनी विठ्ठलपंतांना दोष दिला. या चुकीबद्दल त्यांनी परिमार्जन म्हणून पुन्हा गृहस्थाश्रम स्विकारावा अशी आज्ञा केली.

गुर्वाज्ञा माणुन पुन्हा संसारात लक्ष घातले आणि माघ वद्य प्रतिपदा सोमवार प्रातःकाल शके ११९५ श्रीमुख नाम संवत्सरावर श्री. निवृत्ती नाथांचा जन्म झाला. नंतर ५ वर्षांच्या अंतराने चौघा भावंडाचा जन्म झाला. साक्षात महाविष्णुचा अवतार म्हणून माऊलींनी याच आळंदीत वयाच्या २४ व्या वर्षी शके १२१८ कार्तिक वध १३ इंद्रायणीतिर्थी अलंकापुरीत सिध्देश्वर मंदिराशेजारी समाधी घेतली तीच संजीवन समाधी आहे. याच समाधीने गेली साडेसातशे वर्षे जगभरातील माऊली भक्तांना आपले वेड लावले आहे.

पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत तरी संजीवन समाधीची आस्थारूपी ज्योत भाविकांच्या अंतकरणात तेवत राहील…!

रमेश जे. पाटील
आडगांव ता. चोपडा
जि. जळगाव (खान्देश)
९८५०९८६१००

1 Comment
  1. विंग कमांडर शशिकांत ओक says

    नमस्कार मित्रांनो, आडगाव च्या रमेश पाटील यांनी सादर केलेल्या लेखातून संत ज्ञानेश्वर यांच्या मातापित्यांची माहिती मिळाली.
    संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या बद्दलची ताडपट्ट्यातील मजकुरातून मिळालेली नाडीग्रंथ भविष्य पट्टी अशीच अद्भूत आहे. या बद्दल कोणाला समजून घ्यायला हवे असेल तर 9881901049 वर संपर्क साधावा. विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.