मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना आठवडाभरापूर्वीपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.मात्र भारतरत्नं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. दीदींना लवकर बरं वाटावं यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून ब्रीच कँडी रूग्णालयातील आयसीयूमध्ये लतादीदींवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबरोबरच न्युमोनियाही झालेला असल्यानं प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारांना थोडाबहुत प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षेइतकी प्रकृतीत सुधारणा नाही. उपचार करणा-या डॉक्टरांची वेट अँड वॉचची भूमिका आहे. लता दीदींना ११ जानेवारी रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ब्रिच कँडी रूग्णालयातील ICU मध्ये दाखल केले होते.
याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.लता दीदींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात लता दीदींचं अढळ असं स्थान आहे. आपल्या आवाजाने त्यांनी प्रत्येक पिढीला भूल घातली आहे. त्यामुळे अशी गान कोकिळा लवकरात लवकर बरी होऊन घरी जावी यासाठी प्रत्येक भारतीय आज प्रार्थना करीत आहे.