पोलीस निरीक्षक बकालेंना वैचारिक दिवाळखोरीची सजा

0

लोकशाही संपादकीय लेख 

मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जळगाव पोलीस खात्यातील एलसीबी चे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना अखेर शासनाने तडका फडकी निलंबित केले. त्याआधी जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या तीव्र भावनांची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अखत्यारीत त्यांची एलसीबी पोलीस निरीक्षक पदावरून उचल बांगडी करून बकालेंना पोलीस कंट्रोल रूमला बदली केली होती. तथापि किरण कुमार बकाले यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जळगाव जिल्हा मराठा समाजातर्फे करण्यात आली. मराठा समाजातर्फे ऍड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मराठा समाजातर्फे काळ्याफिती लावून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर निषेध मोर्चा घेऊन बकालेंना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्याकडे मागणी केली होती.

जिल्ह्यातील मराठा समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आक्रमक झाले होते. निषेध मोर्चात मराठा समाजातील महिलांचाही समावेश होता. पोलीस अधीक्षक मोर्चाला समोर जाऊन मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत होते. त्यानंतर त्यांनी कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला अधिकार नाही. पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांवर पोलीस अधीक्षक म्हणून जी कारवाई करण्याचे अधिकार आहेत ते तातडीने त्यांची बदली करून मी केली आहे, तथापि त्यांना निलंबित करावे अथवा आणखी कारवाई करण्याचे अधिकार मला नसले तरी वरिष्ठांना असा प्रस्ताव मी पाठवला आहे. त्या प्रस्तावावर वरिष्ठांकडून कारवाई होईल असे आश्वासन देतो, असे डॉक्टर मुंडे यांनी मराठा समाजाच्या मोर्चेकर्‍यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार रात्रीच पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना निलंबित करण्याचे आदेश पारित झाले आणि पुढील चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आपल्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन केले पाहिजे.

पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी या संयमाने आक्रमक मराठा समाजाची समजूत घालत परिस्थिती हाताळली त्याबद्दल कौतुक करावे लागेल. कारण जिल्हाभरातील मराठा समाज आक्रमक बनला होता. चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजातर्फे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचे विरोधात मराठा समाज आक्रमक आक्रमक बनला होता. बकाले यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली होती. अन्यथा चाळीसगाव तालुक्यातील दहा हजार लोकांचा मोर्चा धडकेल. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला होता. जिल्ह्यातील मराठा समाजातर्फे संतापाची लाट पसरली होती.

“किरण कुमार बकाले यांच्या बैलाला हो” अशा घोषणा मराठा समाजातील तरुणांतर्फे देण्यात आल्या. “एक मराठा लाख मराठा” या ही घोषणा पोलीस अधीक्षकांसमोर मोर्चेकऱ्यांनी दिल्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय दणाणून उठले. रात्रीच बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. तथापि आज रावेर तालुक्यातील मराठा समाजातर्फे मोर्चा काढून बकालींना बडतर्फ करण्याचे निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे प्रहार जनशक्तीतर्फे कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी अर्धनग्न स्थितीत मोर्चा तर्फे निवेदन देऊन बडतर्फेची मागणी केली. परंतु बकाले यांच्या तातडीने निलंबन कारवाईमुळे मराठा समाजाची आक्रमकता कमी झाली.

काल विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार योगायोगाने जळगाव जिल्ह्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी पोलीस निरीक्षक बकाले यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. अशा प्रवृत्तीला पोलीस खात्यात ठेवता कामा नये, त्याला तातडीने बडतर्फ करावे. जेणेकरून पोलीस खात्यातील इतरांना त्याचा वचक बसेल. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक बकाले यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या मागे कोणत्या शक्तीचा हात आहे, याचाही शासनाने तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले हे एक पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आहेत. एलसीबी सारख्या महत्त्वाच्या विभागाची त्यांच्यावर जबाबदारी असताना आपल्या कामाच्या व्यतिरिक्त मराठा समाजावर वादग्रस्त वक्तव्य करण्याचे काही कारण नव्हते. त्यांच्या या वक्तव्याने त्यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून आली.

एकतर मराठा समाजाविषयी किरण कुमार बकाले यांच्या मनात द्वेष भावना असावी, मराठा समाज नव्हे तर कोणत्याही समाजाविषयी कुणालाही वादग्रस्त वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. विशेषतः शासकीय नोकरीत असलेल्यांना आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना तर असे वक्तव्य करून भावना भडकवण्याच्या अधिकार नाही. कायद्याद्वारे शांतता व सुव्यवस्था समाजात स्थापन करून गुण्यागोविंदाचे वातावरण निर्माण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य म्हणावे लागेल. अशा पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करून शांततेचा भंग होईल, असे कृत्य करीत असतील तर अशा प्रवृत्तीला ठेचून काढणे आवश्यक आहे. प्रशासनाने बकाले यांना निलंबित करून योग्य पाऊल उचलले असले तरी ते अपुरे असून बकाले यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची योग्य चौकशी करावी म्हणजे अशी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाही. बकाले सारख्या वैचारिक दिवाळखोरी असलेल्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होत असेल तर अशी कडक कारवाई होणे आवश्यक आहे. प्रशासनाने बकालेंवर केलेल्या कारवाईचे स्वागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.