तन-मन-धन माझे राघवा रुप तुझे तुजविण सर्व संसार ओझे I

0

करुनाष्टक- 4

तन-मन-धन माझें राघवा रुप तुझें I
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें II
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी I
अचल भजनलीला लागली आस तूझी II

नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, जिव्हाने बहु अशा नाना प्रकारच्या चवी ही चाखतो व फिरून झोपून उठतो ही सारी ईश्वरा तुझी दया. अशा आशयाचे काव्य पूर्वी क्रमिक पाठ्यपुस्तकात होते. पण ते सहज व्यक्तीला अंतर्मुख करत. याला काही खूप तत्वज्ञानाची आवश्यकता नाही. आपण खातो,पितो,चालतो – बोलतो ही ईश्वराची दया आहे, तुम्ही ईश्वर माना अथवा मानू नका.

चालते शरीर कोणाचिये सत्ते? कोण बोलवितो हरिविणे?
देखावी ऐकावी एक नारायण I तपाचे भजन चुकू नका.

अस ही संत सांगून जातात. क्षणभर विचार केला तर पटणारी अशीच गोष्ट आहे. आपलं शरीर, आपलं शिक्षण, आप्तपरिवार, मिळविलेलं धन किंबहुना आपण केलेली साधना, तपश्चर्या हे सारं त्याचं असतं पण मोठ्या भक्तांना हे सारे देवाच आहे. अशा बोधाने ते वागत असतात. रहात असतात. त्यांच्या ठिकाणी उद्वेग नसतोच. समर्थही आपल तन-मन-धन हे राघवाचा रूप आहे असं कबुल करतात आणि खरोखरच

मी माझे ऐसी आठवणI विसरले जपाचे
अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर

असा गीतेतही प्रतिपादन आहे. झाडाचे पान हलते ही त्याची सत्ता आहे. औषधाने गुण येतो तीसुद्धा त्याचीच सत्ता. म्हणून तर वैद्ययो नारायण हरी असे म्हणतात. सूर्य उगवतो, चंद्र प्रकाशतो, ऋतू येतात, वर्षा बरसतो, कधी खूप पाऊस पडतो तर कधी अवर्षण होते या गोष्टी काय आपल्या हातात आहेत. हे विशाल विश्व चक्र त्यानेच प्रवर्तित केले आहे. समर्थांना त्या जगदीश्वराची लीला मान्य होती म्हणून अभिमान सोडून ते म्हणतात

तन-मन-धन माझेI राघवा रूप तुझेI
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे II

माझा संसार उत्तम आहे. पण रघुनाथाची कृपा नसेल तर हे ओझेच नाही का? रघुनाथाची भेट झाली तरच सुख, समाधान, शांती, आनंद कारण जिथे भगवंत असतो तेथेच यशश्री, ऐश्वर्य, औदार्य, वैराग्य असे सर्व गुण संपन्न होतात. हीरा कोंदणात शोभून दिसतो तसेच मनुष्य प्राणी ही भक्ती, ज्ञान, वैराग्य याने तेजपूंज होतो.

बोलणे सुंदर, चालणे सुंदरI
भक्ती,ज्ञान, वैराग्य सुंदर करुन दावी I

हे सारं करून दाखवायच. खाया -पिया -मौज किया एवढ्यासाठी हा मनुष्य जन्म नाही. दुर्लभ देह व त्याच्या ठिकाणी असलेल्या शक्ती बुद्धी चा संगम हा रघुनाथाची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे. यासाठी बुद्धी गतानुगतिक नकोय. हे जगत सत्य आहे असं वाटू नये व दृश्य परमात्मा दिसत नाही तर तो नाहीच आहे असं मानणारी बुद्धी नको. दगडाला देव मानणारे तेवढी संकुचित देवाची कल्पना नको श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नको.

ज्या व्यक्तीला परमात्मा आकलन होतो ती बुद्धी खरी सात्विक बुद्धी. नाहीतर श्रद्धा सर्वांचीच असते पण अमुक अमुक दे मी तुला अमुक देईल असा नवस ही झाली राजस श्रद्धा. तर बोकड कापेल बळी देईल, मी दरोडा पाडतो तो यशस्वी होऊ दे ही झाली तामस श्रद्धा. या श्रद्धा रघु प्राप्तीसाठी रघुनाथ प्राप्तीसाठी सहाय्यक ठरणार्‍या नाहीत. आपली श्रद्धा सात्विक असते. अढळ सुद्धा हवी भक्त प्रल्हाद भक्त ध्रुव यांची श्रद्धा होती त्यांच्या कथा आजही अमर आहेत.

अचळ भजन लीला लागली आस तुझी

मासोळी जशी पाण्याविना तडफडते जगू शकत नाही किंवा सासुरवाशीन जशी माहेरच्या वाटे ला डोळे लावून बसते तिचा जीव कासावीस होतो तसा रामराया भेटला नाही तर जिवाची स्थिती व्हावी. त्यासाठी नाम घ्यावे, ध्यान करावे, भजन करावे, किर्तन करावे व त्याची कृपा संपादन करावी. पुन्हा या भक्तिप्रेमात चढ-उतार नको तर तो प्रेमाचा व्यापार व्हावा. जनाबाई देवाशी बोलत असते, भांडत असते, रुसत असते कारण ती तिची सर्व कर्मच देवाला अर्पण करी

दळिता-कांडिता तुझं गाईन अनंता I

ही तिची अवस्था अचल भजन लीलेचे सुंदर उदाहरण आहे. यासाठी एकच प्राप्तव्य हवय बाकी सारी भ्रांती आहे. हे मनाला पटायला हवं. जीवाला एक गोडी लागायला हवी व झडझडोनी भक्तीच्या वाटेवरून चालायला सुरुवात करायला हवी. तन- मन- बुद्धी झोकून देऊन.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.