तुजवीण रघुनाथा… वोखटें सर्व काही II

0

करुणाष्टक- 3

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं I
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व काहीं II
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें I
दुरित दुरि हरावें सस्वरूपी भरावें II

सनईचे मंद स्वर कानावर येत आहेत. सुग्रास भोजनाचा घमघमाट सुटला आहे. यजमान आग्रहानं पंगतीतल्या मंडळींना आग्रह करीत आहेत. अवीट गोडीचे श्रीखंड वाढले जात आहे. एक वाटी खाऊन झाली, दुसरीही संपते आहे, तिसरी येत आहे. तेव्हा आधीच हात आडवा होतो पुरे – पुरे पोटातली भूक संपली आहे व अधिक खाल्ले तर पोट दुखण्याचो संभावना नाकारता येत नाही. विषयापासून मिळणाऱ्या सुखाला अशा मर्यादा आहेत. डायबेटिस वाला तर आधीच वाटी बाहेर काढून ठेवतो. म्हणजे खरे सुख विषयात नसून आपल्या ठिकाणी असते. पण सुख बाहेर शोधण्याचा आपला प्रयत्न व तशी सवय झालेली असते.

आपल्याच आनंदासाठी आपल्याला घरदार मुले – माणसे, नोकर – चाकर, गाडी – घोडा या वस्तू आसपास लागतात. खरा आनंदाचा स्त्रोत आपणच असतो. ह्रदया माजी राम असता सर्व सुखाचा आरामI त्या भ्रांताशी तो काय विषयाचा II समर्थ म्हणतात आपल्याला आराम हवा असेल तर मन रामात रमविले पाहिजे. राम हमारा जप करा, हम बैठे आराम I अशी अत्युच्च भक्तीची पातळी कबीर गाठू शकले. ही शांत अवस्था, निश्चिंत स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.

समर्थांना या बाह्य वस्तूपासून मिळणाऱ्या सुखाचे कल्पना होती. आपण नेहमीच्या व्यवहारात ही पाहतो, एखादी नवीन गाडी आपण घेतली व ती लाभदायक नाही असं म्हटलं तर ती विकून टाकतो, दुसरी घेतो कारण आनंद घेण्याची प्रकट करण्याची गाडी हे माध्यम असते.

तुजविण रघुनाथ हे सर्व काही ओखटे, ओखटे म्हणजे खोटे, भ्रांतीजन्य, त्यात तथ्य नाही कारण लोभाची हाव कधी संपत नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे यात रघुनाथाचीही भेट अंतरते व मृगजळामागे माणूस नुसता धावत राहतो. आपल्याला नेमकं काय हवंय हेही त्याला उमगत नाही.

म्हणून पुढील पंक्तीत ते “रघुकूलटिळका” अशी पुन्हा प्रेमाने रामराया ला हाक मारतात. आई आपल्या लाडक्या मुलाला कधी बबल्या, बंड्या, बाबल्या असे म्हणत राहते. समर्थ ही रघुराया “रघुकुलतिलका” असे प्रेमाने त्या नामाचा पुनरूच्चार करतात. माझे हित रामराया तु करं. इथे हित म्हणजे केवळ समृद्धी नाही तर आत्महित अभिप्रेत आहे. आपुल्या स्वहिता असे जो जागता धन्य माता, पिता त्याचे जगणे. ज्या कुटुंबात त्यांच्या मुलांना भक्तीचे, ज्ञानाचे, योगाचे आवड असते ते माता पिता हे धन्य होतात. चांगली नोकरी, शिक्षण, बंगला, सामाजिक बांधिलकी याच्या बरोबर आत्मदर्शनाच्या पथावर आपलं पाऊल पडत राहणं त्या मार्गानं चालावस वाटणार व धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी साधने हाच खरा पुरुषार्थ.

आयुष्याच्या वळणावर हितचिंतक मार्गदर्शक शुभेच्छुक अनेक भेटतात पण आपली जबाबदारी घेणारा, आपल्यावर कृपा करणारा, आपल्याला भवसागरातून पार करायला मदत करणारा एक राम आहे असा सार्थ विश्वास समर्थांना होता. म्हणून ते त्यालाच म्हणतात तूच माझे हित कर कारण ही वाट दाखवायला आपले आप्त, सगे सोयरे किंवा जन्मदाते आई-वडील हे करू शकत नाहीत गुरु विना कोण दाखवील वाट. गुरु हे अज्ञान दूर करणारे.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.