कोरोनाची तिसरी लाट ओसरली पण…

0

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली. पहिल्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या एकदम वाढल्यामुळे त्यांचेवर उपचार करण्यासाठी दवाखाने अपुरे पडले. कोरोनावर उपचार करणारी यंत्रणा सुध्दा अपुरी पडली. पीपीई किटचा तुटवडा निर्माण झाला. दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याने रूग्णांना कोरोना उपचार करण्यासाठी बेड अपुरे पडले. पहिल्या लाटेत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची अवस्था सुध्दा अत्यंत बिकट होती. कोणीही विशेषत: कुटुंबातील नातेवाईक सुध्दा त्या रूग्णाला हात लावत नव्हते. ज्यांनी हात लावला अथवा जे संपर्कात आले त्यांची कोरोना चाचणी केली जायची आणि कोरोना चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना कॉरंटाईन केले जायचे. त्यानंतर चाचणी जर पॉझिटिव्ह आली तर त्यांना कोविड रूग्णालयात जेथे कोठे कॉट उपलब्ध होईल तेथे त्यांना उपचारार्थ ॲडमिट केले जायचे.

ज्या कोविड रूग्णालयात रूग्णावर उपचार असायचे तेथे नातेवाईकांना भेटण्यास मनाई होती. सबकुछ त्या दवाखान्यातील डॉक्टर – परिचारिका तसेच वॉर्डबॉय यांचेवर अवलंबून असायचे. कोरोना उपचार घेणाऱ्या नातेवाईक आपला जीव मुठीत घेऊन वावरत होते. त्यातच औषधांचा तुटवडा निर्माण झाला. तो नैसर्गिक होता की कृत्रिम तो संशोधनाचा विषय होता. तथापि अव्वाच्या सव्वा दराने औषधी विकली जायची. सर्वसामान्य कुटुंबिय मेटाकुटीस आले होते. अनेकांनी कर्ज काढले. अनेकांनी आपल्या घरातील किडूक मिडूक विकून पैशांची तजबीज केली. ज्यांचे हातावर पोट होते त्यांचे पोट भरणे मुश्‍किल झाले होते. त्यातच लॉकडाऊन लादले गेले.

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती आणखी कठीण झाली. सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे सरसावले आणि या गरिबांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या कीट पोहोचवल्या. त्यामुळे गरिब कुटुंबियांची चूल पेटली गेली. दोन वेळचे जेवण त्यांना मिळू शकले. लॉकडाऊनमुळे ऑटो रिक्षा बंद असल्याने एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात कोरोना सदृष्य जाणीव निर्माण झाली तर त्याला चाचणी केंद्रावर न्यायचे कसे? घरी टू व्हिलर उपलब्ध नाही. अशावेळी शेजारच्यांकडे टू व्हिलर असेल तर ती विनवणी करून मागून घ्यायचे. कुटुंबातील एकाने ती चालवायची व कोरोना चाचणी कुटुंबापर्यंत नेण्यात येत असे. तेथे त्याची चाचणी पाझेटिव्ह आली तर त्याला लगेच कॉरंटाईन सेंटरला घेऊन जायचे व तेथे दाखल करायचे. दरम्यान ज्यांनी टू व्हिलरवर त्या पॉझेटिव्ह रूग्णाला नेले. त्यांच्या कोरोना चाचणीचे असे अनेक प्रश्‍न नागरिकांसमोर उभे राहायचे.

पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेच्या वेळी आरोग्य यंत्रणा सज्ज होती. रूग्णांच्या उपचारासाठी कोवीड रूग्णालये मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आली होती कोवीड रूग्णालये सज्ज होती. उपचार करणाऱ्यांची टीम तयार होती. औषधांचा साठापण उपलब्ध होता. तथापि दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनने मात्र संपूर्ण आरोग्य यंत्रणेची आणि शासन यंत्रणेची झोप उडविली. दुसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांना लागणारा ऑक्सीजनचा साठा पाहिजे तेवढा उपलब्ध नव्हता. ऑक्सीजनची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी विदारक स्थिती निर्माण झाली. त्यासाठी विमानाने सुध्दा ऑक्सीजन मागविण्यात आले आणि रूग्णांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. टँकरद्वारे मागवला गेलेला ऑक्सिजन पुरेसा वेळेवर उपलब्ध होत नव्हता म्हणून रेल्वे ट्रॅकद्वारे ऑक्सिजन मागवण्यात आले.

दरम्यानच्या काळात ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीला सुरूवात झाली. ऑक्सिजन प्लांट निर्मितीला कालावधी लागणार तेवढा लागला. जेव्हा ऑक्सीजन प्लाँट उभारले गेले त्यातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली तेव्हा कोरोनाची दुसरी लाट ओसरली अन्‌ ते ऑक्सीजन प्लाँट आज राज्याची आरोग्य यंत्रणेतील एक प्रॉपर्टी झाली. दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा गाजावाजा दोन – तीन महिने चर्चेत आला. त्यात तिसऱ्या लाटेतील कोरोना ओमायक्रॉन हा भयाण व्हेरियंट आहे अशी भिती घातली गेली. त्यानंतर तिसरी लाट आली. रूग्ण संख्याही वाढू लागली. तथापि वाढलेल्या रूग्णापेक्षा रूग्ण बरे होण्याची संख्या जास्त होती अन्‌ आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांना कोवीड रूग्णालयात ॲडमिट होण्याची आवश्‍यकता भासली नाही.

बरेच रूग्ण घरीच कॉरंटाईन झाले अन्‌ दोन – तीन दिवसात बरे झाले. या स्थितीमुळे तिसऱ्या लाटेची लोकांच्या मनातील भिती दूर झाली. आता तिसरी लाट ओसरत आहे. सर्व व्यवहार सुध्दा सुरळीत सुरू झाले आहेत. प्रवास करतांना दोन लसी ज्यांनी घेतल्या आहेत त्यांनाच परवानगी असेल हा वाद कारण नसतांना वाढला. काही लोक कोर्टात गेले. परंतु कोरोना प्रतिबंधासाठी जर आपण मास्क लावले आणि दोन लसी घेतल्या अन्‌ तिसरा बूस्टर डोस सुध्दा जर ज्येष्ठांनी घेतला तर बिघडले कुठे? परंतु आपल्याकडे उकरून वाद निर्माण करणे ही एक स्टाईल निर्माण झाली आहे. त्यामागे राजकारण असून राजकारण्यांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये. एवढेच या निमित्ताने सूचवावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.