उशिरा का होईना राष्ट्रवादीतर्फे कापूस आंदोलन..!

0

लोकशाही संपादकीय लेख

कालच दै. लोकशाहीने ‘कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा’ हा अग्रलेख लिहून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. मृग नक्षत्र सुरु झाला. आता पाऊस पडला की, कापूस पेरणीचे दिवस आले असताना सुद्धा कापसाला योग्य तो भाव मिळत नाही. म्हणून गतवर्षी उत्पादित केलेला निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या घरात विक्री अभावी शिल्लक आहे. ७ हजार रुपये प्रति क्विंटल कापसाच्या भावात उत्पादन खर्चही मिळत नाही, म्हणून हताश झालेले कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला वाढीव भाव मिळेल या आशेने कापूस विक्री न करता घरातच ठेवला. गेल्या सहा महिन्यात कापसाला १३ हजार ३०० रुपये हमीभाव मिळावा म्हणून महाराष्ट्रभर छोटे-मोठे आंदोलन झाले. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांतर्फे केंद्राकडे तशी मागणी करणारे पत्रही दिले. तथापि त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात टॅक्स लावलेला कापूस आयात करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव वाढवून मिळू शकला नाही, उलट भाव कमी झाला. शिंदे फडणवीस सरकार जरी “आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतोय”, असे म्हणत असले तरी, प्रत्यक्षात मात्र उलटेच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच, शिवसेनेतर्फे गेल्या महिन्याभरात एक एक दिवसाचे आंदोलन झाले. तथापि कालपासून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (Nationalist Congress Party) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केल्याने कापूस आंदोलनाची तीव्रता वाढलेली दिसून येते. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रवींद्र पाटील यांच्या उपोषणाला जोरदार प्रसितात मिळतो आहे. उशिरा का होईना कापूस उत्पादकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे, एवढे मात्र निश्चित. परंतु हे कापूस आंदोलन फक्त प्रसिद्धीसाठी स्टंट आहे, अशी त्याची प्रतिभा निर्माण होता कामा नये. काल जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह पाहिला तर तसे चित्र दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जो आमरण उपोषणाचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण मृग नक्षत्र सुरू झाला असला तरी अद्याप पाऊस पडत नसल्याने मे मध्ये जे 40 ते 45 अंशापर्यंत तापमान होते, तसेच तापमान अजूनही असल्याने एवढा भयंकर तापमानात आंदोलन करणे वाटते तितके सोपे नाही. तथापि उपोषणास बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते रवींद्र पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उचललेले पाऊल योग्य आहे. आता न्याय मिळेपर्यंत मागे हटता कामा नये. जळगाव जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी धन्यवाद देतील यात शंका नाही..

शेतकरी हा देशाच्या अर्थशास्त्रातील कणा आहे, असे सर्वच जण म्हणत असतील तरी शेतकऱ्यांवरील अन्याय मात्र कायमस्वरूपी आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला हमीभाव द्यावा, ही शेतकऱ्यांची रास्त मागणी सर्वच जण मान्य करतात. परंतु उत्पादक खर्चावर आधारित भाव दिला जात नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. सत्तेवर कोणाचेही शासन असले तरी, सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आता सत्तेत असलेल्या शिंदे फडणवीस सरकार विरोधक असताना रोज ‘शेतकऱ्यावर अन्याय होतोय’ म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते. वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली जात होती. आताच्या शासनातील जळगाव जिल्ह्याचे दोन्ही मंत्री ‘वजनदार मंत्री’ म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी कापसाला ९ हजार रुपये भाव मिळावा म्हणून ९ दिवस आमरण उपोषण केले होते. बैलगाडी मोर्चाने जिल्हा हादरवून सोडला होता. परंतु आता मात्र ते चुप्पी साधून आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होतोय हे मान्य करूनही ते घेऊन गप्प बसले आहेत. तशीच परिस्थिती पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आहे. विरोधक असताना शेतकऱ्यांसाठी मोठमोठे मोर्चे काढून जिल्हा हादरवून सोडला होता. आता तेही गप्प आहेत. राजकीय सत्ता ही विचित्र असते म्हणतात, तेही खोटे नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी आपला हिसका दाखवितील यात शंका नाही. देशाचे माजी कृषीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी योगायोगाने राष्ट्रवादी जळगाव जळगाव येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कापूस आंदोलनाला त्यांचे मार्गदर्शन लाभेल, यात शंका नाही. किंबहुना आपले नेते जळगाव येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.