प्रेरणादायी विचारांचा झरा ‘जावे गुंफित अक्षरे’

0

लोकशाही, विशेष लेख

 

भुसावळ (Bhusawal) येथील पेशाने शिक्षक असलेल्या नवोदित कवयित्री संध्या भोळे (बोंडे) (Sandhya Bhole) यांचा पहिलाच काव्यसंग्रह ‘जावे गुंफित अक्षरे’ (Jave Gumpit Akshare )नुकताच प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाला प्रा. बी. एन. चौधरी यांची प्रस्तावना लाभली असून प्रा. डॉ. राम नेमाडे यांचा अभिप्राय, प्रा. देवबा पाटील यांचे पाठबळ तर प्रा. किसन वराडे यांनी पाठराखण केली आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना मनात प्रतिभेचे अंकुर फुटल्यानंतर या संवेदनशील कवयित्रीच्या मनाचा उत्स्फूर्त अविष्कार ‘जावे गुंफित अक्षरे’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून झालेला आहे. एकूण शंभर कविता असलेल्या या काव्यसंग्रहात कवितेची निर्मिती, देवाची व गुरूंची भक्ती, निसर्ग कविता, लेवागणबोली, स्त्री मनाचा आविष्कार, सामाजिक जाणीवा, नातीगोती, बालकविता अशा एक ना अनेक विषयांवर कवितांची गुंफण करण्यात आली आहे. समर्पक मुखपृष्ठातून कवितेचा आशय नेमकेपणाने व्यक्त झालेला आहे. त्यांच्या अनेक कविता प्रेरणादायी विचारांचा झरा आहेत.

जेव्हा आपण कविता व त्यातील सुंदर शब्दरचना वाचतो तेव्हा कवीकडे असलेल्या अलौकिक प्रतिभेचा आपल्याला प्रत्यय येतो. दैनंदिन व्यवहारात आपण जे शब्द वापरतो तेच शब्द वापरून कवितेसाठी कवी नेमके शब्द वापरतो. अशा कविता एक वेगळा अनुभव आणि आनंद देत असतात. कलानिर्मितीच्या वेळी माणसाच्या विचारात अलौकिकता असावी लागते. जे प्रतिभावंत असतात त्यांच्या संवेदनक्षमता सूक्ष्म, तीव्र स्वरुपाच्या असतात. जे पाहिले त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्यानंतर अनुभव, कल्पना, भाव, विचार यातून कवितेची निर्मिती होते. इतरांनी घेतलेल्या अनुभवांशी कल्पनाशक्ती व तीव्र संवेदनशक्तीमुळे कवीला लेखनाची शैली प्राप्त होते. त्यामुळेच कविता निर्माण होतात. अशाच प्रकारचा अनुभव जावे गुंफित अक्षरे, लेखणी माझी यासारख्या कवितांमधून येतो.

संध्या भोळे यांनी लिहिलेली बालकविता महत्त्वाची आहे. त्यांची बालकविता एकसुरी व एकरंगी नाही. त्यात विविधता आहे. गणपती बाप्पा, मनीम्याऊ, पाटी पुस्तक, या मुलांनो, पक्ष्या रे पक्ष्या, चिऊताई, पतंग माझा या त्यांच्या कविता लहान मुलांना मनोरंजनासाठी आहेत. बालमनाशी आपुलकीचा संवाद साधणारी त्यांची कविता आहे. मुलांच्या मनाशी संवाद साधणे हे त्यांच्या बालकवितेचे वैशिष्ट्य आहे. यात घर, माणसे, नातीगोती, पशू-पक्ष्यांचे जग साकार झाले आहे. त्यांनी आपल्या कवितेत विविधता आणली आहे. जावे गुंफित अक्षरे हा काव्यसंग्रह म्हणजे विविध प्रकारच्या कवितांची गुंफण केलेला गुच्छ आहे. जीवनभाव, जीवन ऐसे नाव, सुख म्हणजे, पराभवाची अकस्मात वादळे असे सामाजिक जाणिवेच्या विविध प्रकारचे दर्शन या काव्यसंग्रहात आहेत. दाह ग्रीष्माचा, शेतकरी मह्या धनी या त्यांच्या कवितांतून शेतकऱ्यांचे दु:ख व्यक्त करणारा कळवळा आहे. त्यातून ते शेतकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडतात. त्यांना निसर्गाची आवड आहे. त्यांच्या कवितेतून निसर्गातील सौंदर्याचे सुक्ष्म वर्णन त्यांनी श्रावणगान, हिरवा शालू, सुंदर बन, गुलाब या कवितांमधून केले आहे. पर्यावरणविषयक जागतृता निर्माण करण्याचा संदेशही त्या देतात. विठ्ठलाच्या भक्तीचा महिमासुद्धा त्यांनी आपल्या विठ्ठला तुझी आस, आषाढीची वारी या काही कवितांमधून वर्णिला आहे.

त्याच्या कवितांतून स्त्री जाणिवा व स्त्री संवेदना उमटून स्त्रियांचं भावविश्व दिसते. कवितांचा आशय आणि अभिव्यक्तीत स्त्री जाणिवा आहेत. नववधू, तुझं अस्तित्व, माहेरची वाट, स्त्री मनाचा गुंता, तू होतीस तेव्हा या कविता स्त्री जाणिवा समृद्ध करणाऱ्या आहेत. त्यांनी विविध विषय हाताळल्याने त्यांच्या कवितेतल्या आशयाचे नाविन्य पटकन लक्षात येते. त्यांच्या कवितांतून घर, स्त्री आणि पुरुष उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आशयविशेषांवर भर दिला आहे. त्यांच्या कविता व्यापक आशय व अर्थक्षमता दर्शवणाऱ्या आहेत. त्यांच्या कवितेतील स्त्रीविषयक लेखन व चिंतन वाचकांना नवदृष्टी देणारे आहे. बहिणाबाईंच्या लेवागणबोलीतील गाण्यांनी या बोलीभाषेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली आहे. लेवा गणबोलीचा अनमोल ठेवा आपल्याला लाभलेला असून तिचे संवर्धन आपण केले पाहिजे. लेवा गणबोली ही समृद्ध करायची असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. याच अनुषंगाने या काव्यसंग्रहात माणूसपन, माय मही म्हने, मायचं सपन अशा कविता आल्या आहेत.

त्यांच्या कविता म्हणजे स्त्री मनाच्या भावनांचा आविष्कार आहे. जीवनातल्या टप्प्यांत स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, असुरक्षितता यांचे शब्दरूप दर्शन त्यांच्या कविता घडवतात. कविता ही त्यांची मैत्रीण आहे. स्त्रीपणाचे अनुभव घेतल्यावर त्यांची कविता जन्माला आली. स्त्री जीवनातील संवेदनशील भावना व हळवेपण त्यांच्या कवितेत झालेले आहे. एकूणच हा काव्यसंग्रह सर्वसमावेशक झाला आहे.

डॉ. जगदीश पाटील
भुसावळ
8149498020

Leave A Reply

Your email address will not be published.