जालन्यातील आंदोलनकर्त्यांना अमानुषपणे मारहाण, १०० पेक्षा जास्त जण जखमी

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आंदोलनकर्त्यांवर काल जालन्यातील अंतरवली सराटी गावात पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्ज मध्ये १०० पेक्षा जास्त मराठा आंदोलनकर्ते जखमी झाले आहे. पोलिसांनी महिलांनासुद्धा अमानुषपणे लाठीचार्ज केला व त्यात त्या जखमीसुद्धा झाल्या आहेत. अशी माहिती समोर आली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: आज जालन्यात दाखल झाले आहे. त्यांनी अंबड येथील रुग्णालयात दाखल होऊन जखमींची विचारपूस केली.

यावेळी आंदोलनात जखमी झालेल्या आंदोलकांनी सर्व व्यथा सांगितली.पोलिसांनी मोठ्यांना तर सोडाच पण, लहान बालकांनासुद्धा सोडले नाही. साहेब, आम्ही माळकरी माणसं आहोत. आमच्यावरी लाठीचार्ज करण्यात आला, अशी तक्रार आंदोलक शरद पवार यांच्याजवळ करत होते. आंदोलकांच्या पत्नीलासुद्धा यात जबर मारहाण करण्यात आल्याचे सांगितले आहे. या महिलेची देखील शरद पवार यांनी विचारपूस केली असता, आपल्याला 10 टाके पडल्याची माहिती यावेळी शरद पवारांना महिलेने सांगितलं.

काय आहे प्रकरण?
“व्याख्यान सुरु होतं तर आम्ही व्याख्यान ऐकत होतो. पोलीस आले ते आम्हाला मनोज पाटलांना भेटायचं आहे, असं म्हणाले. ते शांततेत गेले. त्यानंतर लगेच लाठीचार्ज सुरु केला. आमच्या घरातल्या पाच जणांना मारलं. घरातल्या लहान मुलांनाही मारहाण केली”, अशी तक्रार महिलेने शरद पवार यांच्याकडे केली.

अंबड जिल्हा रुग्णालयात ९ ते १० जखमींचा उपचार सुरु आहे. या प्रत्येक जखमींच्या नावाची यादी शरद पवार यांच्याकडे आहे. या रुग्णालयानंतर ते वडी गोदडी येथील रुग्णालयात जाणार आहेत. तेथे दाखल केलेल्या महिला आंदोलकांची ते विचारपूस करतील.

दरम्यान, हे सगळं प्लॅनिंग करुन मारलं. कुणाचा तरी फोन आला त्यानंतर लाठीमार केला, अशी तक्रार एका जखमी आंदोलकाने शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे देखील आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.