खडसेंनी डॉक्टरचे कारण सांगून उमेदवारीपासून पळ काढला; संजय पवारांनी केले अनेक आरोप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आज अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी अत्यंत खळबळजनक आरोप आयोजित पत्रकार परिषदेत केले. त्यांनी खडसेंना खडेबोल सुनावत विधानपरिषदेत आमदार करण्यासाठी ज्या आमदारांनी मतदान केले, ते आमदार व मंत्री अनिल पाटील आज अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आधी खडसेंनी राजीनामा द्यावा, मगच अजित पवारांवर व त्यांच्या कुतुम्बियानावर भाष्य करावे. इतकेच काय, तर सुनेला भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचे देखील ते बोलले.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर टीका केली होती कि, अजित पवार यांनी सन्मान गमावला व बायकोसह तीन जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर मंत्री अनिल पाटील चार महिन्यांचे आमदार राहिले आहेत, असे विधान केले होते. दरम्यान त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, योगेश देसले उपस्थित होते.

खडसे यांच्या राजकीय जीवनाची संध्याकाळ झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी त्यांना आपला हात देऊन त्यांच्या आयुष्यात नवी पहाट केली आणि त्यांना आमदार करीत पुन्हा संधी मिळवून दिली. ज्या आमदारांनी खडसे यांना विधानपरिषदेसाठी मतदान केले ते आज अजित पवार यांच्यासोबत आहेत. पक्ष वाढेल म्हणून त्यांना विरोध असताना पक्षात घेतले, त्यांच्यामुळे पक्ष तर वाढलाच नाही, उलट गट तट निर्माण होऊन आपसात वाद सुरू झाले. लोकसभेची निवडणूक आपण लढणार असे सुरुवातीपासून सांगून रावेरची जागा राष्ट्रवादीकडे घेतली. आता डॉक्टरचे व आरोग्याचे कारण सांगून उमेदवारीपासून पळ काढला. भाजपकडून सुनेची उमेदवारी निश्चित करून घेतली. खरे तर सुनेच्या उमेदवारीसाठीच त्यांनी ही आखणी केली होती. एकप्रकारे शरद पवारांचा विश्वासघातच केला आहे.

स्वत:ला आमदारकी, सुनेला खासदार, पत्नीला दूध संघ व महानंदमध्ये चेअरमन, मुलीला पक्षात प्रदेशाध्यक्षपद व विधानसभेतही त्याच उमेदवार असतील असे सांगतात. त्यांनी पद व सत्तेचा वापर फक्त कुटूंबासाठी व लोकांना संपविण्यासाठीच केल्याचा आरोप संजय पवार यांनी यावेळी केला.

सोबतच खडसे यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेशदादा जैन, माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील यांना राजकारणातून संपविले. माजी मंत्री सतीश पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मला पक्षातून बडतर्फ करायला लावले. सुनेसाठी स्व. हरिभाऊ जावळे खासदार असताना त्यांचे तिकीट कापले. त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेशदादा जैन यांनी थेट तुरुंगातून निवडणूक लढवून पक्षानिष्ठता राखली होती त्याचा आदर्श ठेवून खडसेंनी निवडणूक लढवावी असे आवाहन ही संजय पवार यांनी केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.