महिला उमेदवारांमुळे वाढणार दोन्ही मतदारसंघात चुरस

जळगावात स्मिताताईंविरोधात ॲड. ललिता पाटील?, तर रावेरात राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला उमेदवार देण्याची प्रथा दृढ होत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने महिला उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीकडूनही महिला उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. महिला उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. जळगाव मतदारसंघात भाजपाच्या स्मिताताई वाघ यांच्या विरोधात उद्धव ठाकच्या शिवसेनेकडून ॲड. ललिता पाटील या उमेदवारी लढविण्याच्या तयारीत आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्या विरोधात सक्षम महिला उमेदवार देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. एकंदरीत दोघा मतदारसंघात महिला उमेदवार राहणार असून चुरस निर्माण होणार आहे.

स्मिताताई विरुद्ध ललिता पाटील

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिताताई वाघ यांच्या विरोधात उद्धव ठाकच्या शिवसेनेकडून ॲड. ललिता पाटील या लढत देण्याची शक्यता वाढली आहे. ॲड. ललिता पाटील यांच्या पाठी निवडणूक लढण्याचा अनुभव असून त्यांचा बऱ्यापैकी संपर्क देखील आहेत. शिवसेनेकडील इच्छुक असलेले माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने यांचा जनसंपर्क नसल्याने व त्यांना मोठी निवडणूक लढविण्याचा अनुभव नसल्याने त्यांची नावे मागे पडली आहेत. ॲड. ललिता पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘शिवबंध’ बांधल्याने त्यांच्या बद्दल अंतर्गत नाराजी असली तरी सक्षम उमेदवार देण्यावर पक्ष भर देत आहे. शिवसेना अजूनही एखाद्या आयात उमेदवाराचा शोध घेत असून त्यात त्यांना कसे यश येते यावर सर्वकाही अवलंबून आहे. माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी अद्यापही शिवसेनेला ‘होकार’ दिला नसल्याने त्यांचे नाव पुढे येत नाही, मात्र ऐनवेळी शिवसेना ‘खेळी’ खेळण्याच्या प्रयत्नात आहे. जळगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून ते या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात आहे.

रक्षाताईंच्या विरोधात कोण?

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत विरोधकांची ‘हवा’ काढण्याचे काम केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ असल्याने त्यांच्याकडे सक्षम महिला उमेदवार नसल्याने ते त्याचा शोध घेत आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कन्या तथा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारीची गळ घातली जात असून त्या मात्र विधानसभेसाठी इच्छुक असल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी स्वत:च्या उमेदवारीबाबत गुप्तता कायम ठेवल्यामुळे विरोधही सावध झाले होते. भाजपाने खडसे कुटुंबाकडेच उमेदवारी दिल्यामुळे पुन्हा परिवारातील कुणी उमेदवारी घेईल ही शक्यता फोल ठरणार आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून ‘परिवारा’वरील संकट टाळले असल्याने खडसे परिवार त्यात दगाफटका करणार नाही अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीला उमेदवार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने भाजपाचा मार्ग ‘सोपा’ होत आहे.

उन्मेष पाटील पक्षासोबतच

भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली असतांना ते पक्षापासून दूर जातील अशी चर्चा रंगली असतांना स्वत: पाटील यांनी आपण पक्षासोबत असून एकनिष्ठेने प्रचारात सहभागी होवू असे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उन्मेष पाटील चाळीसगावचे आमदार असतांना त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. आता खासदारकीही जमा झाली असली तरी ते पक्षासोबत राहून काम करण्यावर भर देणार आहेत. उन्मेष पाटील यांच्यासमोर तूर्त भाजपा हाच पर्याय आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.