जिल्हा दूध संघ निवडणूक निकालाचे कवित्व सुरू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक (Jalgaon Jilha dudh Sangh Election) पार पडली. शिंदे भाजप गटातर्फे (Shinde – BJP Group ) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan)  यांचा या विजयात सिंहाचा वाटा असला तरी चाळीसगावचे भाजपचे आ. मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी मात्र दूध संघ निवडणूक जाहीर होण्यापासून निवडणूक प्रचारात तसेच दूध संघाचे विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर (Muktainagar) तालुका मतदार संघात जाऊन निवडणूक लढवली आणि मंदाकिनी खडसे यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणली. त्यामुळे आ. मंगेश चव्हाण यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंदाकिनी खडसे यांच्या पराभवामुळे एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) फार मोठा धक्का बसला. कारण दूध संघ निवडणुकीत खडसेंच्या सहकार पॅनलचा पराभव झाल्याने ‘गड गेला’ आणि मंदाकिनी खडसे यांच्या पराभवामुळे ‘सिंहही गेला’ असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांना निवडणूक जिंकण्याचे श्रेय असले, तरी शेतकरी विकास पॅनल मधील उमेदवार आ. मंगेश चव्हाण हे मात्र हिरो ठरले आहेत, एवढे मात्र निश्चित.

चाळीसगावचे आमदार असून स्वतःचा मतदार संघ सोडून मुक्ताईनगरमध्ये, तेही एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन निवडणूक लढवली आणि खडसेंच्या धर्मपत्नींचा पराभव केला. त्यामुळे मंगेश चव्हाण यांचा संदर्भात जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. दूध संघाची निवडणूक घोषित होण्यापूर्वी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय प्रमुख म्हणून 34 दिवसाच्या कालावधीत जिल्हा दूध संघाच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली. लोण्याची चोरी, बी ग्रेड तूप आदींचा अपहार मंगेश चव्हाण यांनी बाहेर काढला. संघाच्या कार्यकारी संचालकांवरच गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यामुळे प्रशासकीय मंडळाचे प्रमुख म्हणून मंगेश चव्हाण निवडणुकीपूर्वीच चर्चेत आले होते. त्यातच एकनाथ खडसे यांच्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात अग्रस्थानी असलेल्या मंगेश चव्हाणांची दूध संघाच्या निवडणुकीसाठीची वाट सुकर झाली होती. त्यामुळे आ. मंगेश चव्हाण हेच दूध संघ निवडणुकीचे हिरो ठरले.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तोट्यात असताना गेल्या सात वर्षात संघ नफ्यात आणला, शंभर कोटींची संघाच्या विकासासाठी गुंतवणूक केली. दरम्यान पारदर्शक व्यवहार असण्याचा दावा करणारे एकनाथ खडसे यांचा दावा खोटा असल्याचे अनेक उदाहरणे देऊन जनतेसमोर मांडण्याचा आ. मंगेश चव्हाण यांनी वारंवार प्रयत्न केला. त्यामुळे सुद्धा मतदारांचे मत परिवर्तन होण्यास मदत झाली, असे म्हणता येईल. यामध्ये किती खरे किती खोटे, हा जरी तपासाचा भाग असला तरी जे काही आरोप करायचे ते रेटून करायचे हे धोरण खडसेंच्या विरोधात मंगेश चव्हाण यांनी केले. त्यामुळे खडसेंवर आरोप प्रत्यारोप करून त्यांना त्यात गुंतवून ठेवण्यात मात्र मंगेश चव्हाण यशस्वी झाले.

मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या दोघांनी आ. मंगेश चव्हाण यांना खडसेंच्या विरोधात बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे दोन-तीन दिवसाआड खडसेंच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन मंगेश चव्हाण आरोप करायचे. मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या आरोपांना उत्तर देऊन पलटवार करायचे. आ. मंगेश चव्हाण आणि एकनाथ खडसे यांच्या या आरोप प्रत्यारोपामुळे जनतेची मात्र करमणूक व्हायची. त्यात मंगेश चव्हाण आरोप करण्यास प्रभावी ठरले. त्यामुळे ते चर्चेत राहिले. दूध संघातील चोरी की अपहार प्रकरणी एकनाथ खडसेंकडून पोलीस स्टेशनमध्ये जे आंदोलन केले आणि ठिया मांडला, त्याचीही जोरदार चर्चा झाली. तथापि ज्या तडफेने ठिय्या आंदोलन केले होते, ते आंदोलन फोल गेले, अशा चर्चांना उधाण आले.

दुसरीकडे आ. मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील कथित अपहार प्रकरणी पोलीस अधीक्षकांना साधे पत्र दिले. तर त्याची मात्र पोलिसांनी दखल घेतली आणि कारवाई केली. त्यामुळे याबाबतीतही मंगेश चव्हाण खडसेंपेक्षा वरचढ झाले, अशी चर्चा झाली. आ. मंगेश चव्हाणांच्या या पत्राची पोलिसांकडून दखल घेतली हा सत्तेचा महिमा असला तरी, जनतेला मात्र हे कळत असले तरी वळत नाही असे म्हणतात ते खरे आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंचा कर्दनकाळ ठरणारे मंगेश चव्हाण चर्चेत राहिले. शिंदे भाजप गटाच्या शेतकरी विकास पॅनलकडे दूध संघाची सत्ता आली. दूध संघाच्या चेअरमन पदी आ. मंगेश चव्हाण यांची वर्णी लागणार, अशी चर्चा आहे. मंगेश चव्हाण हे गिरीश महाजनांचे विश्वासू सहकारी असल्याने त्यांचीच दूध संघाच्या चेअरमन पदी वर्णी लागू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.