सदोष चौपदरी महामार्गाने घेतला कॉलेज तरुणीचा बळी

0

लोकशाही विशेष

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नव्हती. म्हणून लोकाग्रहास्तव, त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली. अखेर हा मार्ग झाला. चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून महामार्गाचे काम सदोष होत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी दिल्या. परंतु त्याची त्यावेळी कुणी दखल घेतली नाही. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे करण्यात आलेले रोटरी स्क्वेअर चुकीचे व सदोष असून अपघाताला निमंत्रण देणारे असल्याच्या तक्रारी केल्या. त्यासाठी आंदोलने झाली, पण जनतेच्या म्हणण्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.

महामार्गावर प्रभात चौक जवळ तसेच मु. जे महाविद्यालयाच्या मार्गावरील अंडरपास सदोष असल्याचे तांत्रिकदृष्ट्या पुराव्यानिशी दाखवून दिले गेले. परंतु त्याचेही म्हणणे ऐकले गेले नाही. चौपदरीकरण महामार्गातील समांतर रस्ते करण्याची मागणी तर दूरच राहिली. वास्तविक महामार्ग हे पालिकेचे काम असताना जणू हे आमचे काम नाही या अविर्भावात महापालिका व त्यांचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मंडळी चुप्पी साधून आहेत. आज ज्या तरुणीला ट्रकने चिरडले ती तरुणी उच्चशिक्षित होती. अभ्यासात अत्यंत हुशार होती. सीए होण्याचे तिचे स्वप्न होते. त्या तिच्या स्वप्नावर पाणी फिरले. सदर तरुणी ही महापालिकेतील नगरसेवकांची नातेवाईक होती, हे विशेष होय.

आता तरी महापालिकेतील नगरसेवकांना जाग येईल का? सदर तरुणी जागीच ठार झाली तर तिच्या भाऊ गंभीर जखमी झाला आहे. तो थोडक्यात बचावला. ज्यांचेवर हे संकट ओढावले त्या सोनवणे कुटुंबाची भर कशाने भरून निघेल ? त्यांच्या या संकटाला जबाबदार कोण ? वर्ष झाले चौपदरीकरणाचे काम होऊन, परंतु या महामार्गावर अद्याप पथदिवे नसल्याने महामार्ग संपूर्ण अंधारात आहे. रात्रीच्या वेळेला डिव्हायडरला धडक देऊन अनेक किरकोळ अपघात झाले.

आता झालेले पथदिवे लावण्याचे काम म्हणजे वर्षानंतर उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. तरी सुद्धा महामार्गाचे मध्यभागी गेल्या महिन्याभरापासून नुसते खांब उभे केले आहेत. दिव्यांचा पत्ता नाही. दिवसा वाहने चालवणाऱ्याला वाटते की पथदिवे सुरू आहेत. पण दिव्याखाली अंधार आहे, असे म्हणण्याचा प्रकार आहे. दिवाळीला महामार्गावर रोषणाई होईल, असे सांगण्यात आले. तथापि दिवाळी सुद्धा अंधारातच गेली. अजून किती दिवस हे दिवे पेटणार नाही, हे महापालिकेलाच माहीत. अशा प्रकारे ‘अंधार नगरी चौपट राजा’ अशी महापालिकेचे अवस्था झालेली आहे.

आकाशवाणी चौकातील रोटरी स्क्वेअर सदोष असल्यामुळे तेथे दररोज किरकोळ अपघात होतात. एकदा तर एक मोठा अपघात टळला. अख्खा ट्रक चौकाचे कठडे तोडून आत घुसला होता. इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे तसाच प्रकार आहे. कालिंका माता मंदिराजवळ क्रॉसिंग अत्यंत चुकीच्या पद्धतीने असल्याने वाहनधारकांची कोंडी होते. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी जेव्हा या चौपदरीकरणाचे उद्घाटन केले, या महामार्गाची पाहणी केली आणि महामार्गाचे चौपदरीकरण चुकीचे झाले असल्याचा शेरा मारला होता.

आपल्या उद्घाटनाच्या भाषणात त्यांनी खोटे नगर ते तरसोद पर्यंत संपूर्ण उड्डाणपूल होणे अनावश्यक असल्याचे सांगितले. तेव्हा या समारंभात उपस्थितीत असलेले आपले लोकप्रतिनिधींची अवाक होऊन पाहत राहिले. म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी विशेषता जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विकासाच्या बाबतीत अत्यंत अल्पसंतुष्ट आहेत. साडेचार किलोमीटरचे चौपदरीकरण मंत्री नितीन गडकरींनी केंद्राच्या अखत्यारीतून करून दिले. जळगावकरांना ‘हिंग लगे ना फिटकरी’, परंतु श्रेय घेण्यासाठी मात्र सर्व लोकप्रतिनिधी अग्रेसर असतात, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात तुम्ही कामे घेऊन या मी माझ्या अखत्यारीत करून देतो. तरीसुद्धा आपल्या लोकप्रतिनिधींना त्याचे काहीही वाटत नाही. खोटे नगर ते  तरसोद संपूर्ण उड्डाणपूल झाला पाहिजे असे म्हणणाऱ्या गडकरींकडे पाठपुरावा केला असता तर आज हे संपूर्ण चौपदरीकरण उड्डाणपूलाचे झाले असते. अपघात होण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. संपूर्ण शहरातील वाहतूक सुरक्षित झाली असती.

आज उच्चशिक्षित तरुणी मनस्वी सुभाष सोनवणे हिचा बळी गेला. या अपघाताची जळगाव महापालिकेतील प्रशासनाने गंभीर दखल घेऊन यापुढे अपघात होणार नाही, यासाठी पथदिवे, समांतर रस्ते आणि चौकातील सदोष पद्धतीत सुधारणा करावी. अन्यथा मनस्वी सारखे अनेक बळी जातील.

धों. ज. गुरव 

सल्लागार संपादक 

दै. लोकशाही, जळगाव 

Leave A Reply

Your email address will not be published.