सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत

0

लोकशाही संपादकीय लेख

२०२३ साल संपले… सरते वर्ष जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने चांगले वाईट घटनांचे संमिश्र वर्ष म्हणता येईल. जिल्ह्याच्या दृष्टीने चांगल्या घटनांचा विचार केला तर, पंचवीस वर्षापासून तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे प्रलंबित असलेले काम २०२३ मध्ये पूर्णत्वास आले. जळगाव जिल्ह्यातील नदी किनारपट्टीवरील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. तसेच प्रामुख्याने भुसावळ शहर, जळगाव एमआयडीसी व शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात्र मात करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच असोदा, भादली, नशिराबाद या मोठ्या गावांमधील सातत्याने भेडसावणारा पाणी प्रश्न देखील सुटणार आहे. २०२४ मध्ये शेळगाव प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जाणार असून वन जमिनीची तांत्रिक अडचण सुद्धा दूर झालेली असेल. १५ हेक्टर वन जमिनीमुळे प्रकल्पासाठी अडथळा होता, तोही २०२३ मध्ये दूर झालेला असल्याने जळगाव भुसावळ व यावल तालुक्यासाठी हा प्रकल्प सुजलाम सुफलाम ठरणार आहे. त्याचबरोबर सिंचनाच्या बाबतीत अंमळनेर, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे तालुक्याचा कायापालट करणारे आणि विशेषतः अमळनेर तालुक्यासाठी तालुक्याची लाईफ लाईन ठरणाऱ्या तापी नदीवरील पाडळसे धरणाला ४८९० कोटी रुपयांची सुधारित मान्यता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने मिळाली. गेल्या पंचवीस वर्षापासून गोगलगायीच्या गतीने चालू असलेल्या प्रकल्पाचे अवघे 30 टक्केच काम झाले होते. पाडळसे धरणाचे भवितव्य अंधारात आहे, ते होणार नाही. अशा चिंतेत अमळनेर तालुक्याची जनता असताना त्या धरणासाठी मंत्री मंडळांने दिलेल्या चतुर्थ सुधारित ४८९० कोटीच्या मान्यतेमुळे केंद्राच्या निधीचा मार्ग मोकळा झालं. आता या धरणाच्या बांधकामाला गती मिळेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे. जळगाव मुख्य शहर आणि शिवाजी नगरला जोडणारा पूल निहित वेळेपेक्षा उशिरा का होईना २०२३ मध्ये पूर्ण झाला जळगाव शहर आणि शिवाजीनगरच्या पलीकडे असलेल्या ग्रामीण भागासाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याचबरोबर पिंप्राळा रेल्वे ओवर बीज निहित वेळेच्या आत महारेलने पूर्ण केल्याने जळगावकरांना शिवाजीनगर अवघ्या तीन मिनिटात जाता येणार आहे. या पुलाचे लोकार्पण २०२३ मध्येच झाले. तापी नदीवरील खेडी भोकरी येथील पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ २०२३ मध्ये झाला. त्यामुळे जळगावहून चोपडा जाणाऱ्यांचे अंतर २० ते २५ किलोमीटरने कमी होणार आहे. त्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सुद्धा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत २०२३ मध्ये झाला. पिंप्राळा येथे शिवस्मारक आणि शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण सुद्धा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. शिवस्मारकामुळे पिंप्राळा तसेच जळगाव शहराच्या वैभववात भर पडणार आहे. जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या क्रीडा रसिक तसेच क्रीडा पटूसाठी भव्य अशा क्रीडा संकुलासाठी ग्राम विकास मंत्री महाजन यांच्या प्रयत्नाने मान्यता मिळाली ती २०२३ मध्येच. जळगाव जिल्ह्यातील गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ जळगाव तसेच पाचोरा येथे पार पडले. त्यात प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार खासदारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यात शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील भारतीयांच्या दृष्टीने शासन आपल्या दारी हा उपक्रम एक प्रकारे पर्वणीच ठरला. २०२३ मधील काही या चांगल्या घटना ओझरता घटनांचा ओझरता ऊहापोह करता येईल..

जिल्ह्याच्या दृष्टीने २०२३ सालचा विचार केला तर जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती काही थांबतात थांबत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती ही विकृती प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी म्हणता येईल. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका आठ वर्षाच्या बालिकेवर एका नराधम तरुणाने अत्याचार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह चाऱ्याच्या ढिगारात लपवून ठेवल्याची घटना हृदयदावक होती. यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. सर्वत्र या घटने संदर्भात हळहळ व्यक्त करत होते. खून, मारामारी, चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा पोलिसांच्या कडक कारवाईनंतरही चालूच आहेत. अशा घटनांमुळे मन सुन्न होते. रस्त्यावर होणारे अपघात सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. भरदाव वाहनाने दुचाकी स्वाराला उडवल्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. जिल्ह्यात वाळूमाफियांवर नियंत्रण आणण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असताना सुद्धा वाळू माफियांची दादागिरी थांबता थांबेना. जिल्ह्यातील चोपड्याच्या प्रांताधिकार्‍यांनी अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले तर त्यांच्या कारवर ट्रॅक्टर घालून कारचे नुकसान केले. त्याच प्रांताधिकारी जखमी झाले. एवढी हिम्मत वाळू माफियांची वाढली आहे. जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा व तापी नद्या अवैध वाळू उपसा केल्याने अक्षरशा बोडक्या झाल्या आहेत. काल-परवाचीच घटना म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर वाळू माफिया पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करत असल्याची घटना घडली. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर सोशल मीडियावर स्टेटस करून निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा पाठलाग करण्याची हिम्मत वाळू माफिया करतात, तर सर्वसामान्यांचे काय? हा प्रश्न सर्वांना त्रासदायक आहे. त्यामुळे २०२३ सालातील वाढत्या गुन्हेगारीचा २०२४ च्या नवीन वर्षात नियंत्रण आणले जाईल हीच अपेक्षा. २०२४ च्या नव्या वर्षाचे स्वागत करताना जिल्ह्यासाठी हे वर्ष समाधानकारक राहो हीच अपेक्षा…!

Leave A Reply

Your email address will not be published.