वाळूजमध्ये अग्नितांडव ; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

0

वाळूज महानगर ;- लेदरपासून हातमोजे बनवणाऱ्या एका कंपनीत रविवारी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या अग्नितांडवात सहा कामगारांसह एका श्वानाचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, यातील काही कामगारांनी गेट व झाडावर चढून उड्या मारत आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. यामुळे ते बालंबाल वाचले. आगीची भीषणता इतकी होती की, पहाटे पाच वाजेपर्यंत सहा बंबांच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांचे आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने मात्र वाळूज महानगरसह कामगार वसाहतीवर शोककळा पसरली आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर (प्लॉट क्र. २१६) साबेर खान शब्बीर खान पठाण (रा. बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांची सनशाइन इंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. येथे लेदरचे हातमोजे बनवले जातात. यासाठी मो. असमुद्दिन शेख (रा. बिहार) हे ठेकेदार आहेत. ठेकेदारासह त्यांची पत्नी इसमत परवीन शेख, मुलगा मोहम्मद मुजमीन शेख, मुलगी आयेशा शेख यांच्यासह एकूण १७ कामगार काम करत होते. हे सर्व कामगार बिहार राज्यातील असून कुटुंबासह कंपनीतच राहत होते. शनिवारी काम आटोपून जेवण झाल्यानंतर ते झोपी गेले. दरम्यान, रविवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास कंपनीस भीषण आग लागली. यावेळी हे सर्वजण गाढ झोपेत होते. आग लागताच सर्वत्र धुराचे लोट उठल्याने त्याची धग व चटके त्यांना बसल्याने काही कामगार झोपेतून उठून बाहेर पव्ळाले. पाहता पाहता ही आग चौफेर भडकल्याने सहा कामगार यात अडकले. सोबत एक पाळीव श्वानही होता. हे सर्वजण बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाल्याने त्यांना येता आले नाही. सुमारे तीन तास अडकून पडलेले हे कामगार
आगीच्या लपेटात येताच अक्षरशः खाक झाले.

दरम्यान, आगीची घटना कळताच वाळूज अग्निशमन दलाचे दोन बंब, बजाजचा १, मनपाचा २ व चिकलठाणा अग्निशमन दलाचा एक अशा एकूण सहा बंबांसह वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. दरम्यान, १०८ क्रमांकाच्या ४ रुग्णवाहिका आल्या. एक बाजू वगळता सर्व बाजूंनी बंदिस्त असलेल्या या कंपनीतील आग जास्तच भडकल्याने अथक परिश्रम करून अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. तरीही आग सुरूच होती. प्रथम आतमध्ये अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. एक कुत्राही या आगीत होरपळून मृत्युमुखी पडला. सर्व मयत कामगारांचे मृतदेह घाटी दवाखान्यात रवाना करण्यात आले.

सहा कामगार मृत्युमुखी
दरम्यान, या आगीत मो. मुस्ताक मो इब्राहीम (६२), कौशर आलम जफ्फीरुद्दीन (३७), मो. एक्बाल मो. एहरार (१७), मो. मार्गब आलम सहाबुद्दीन (३२, हे सर्व रा. ग्राम डलौखर, ता. मिर्झापूर, जि. मधुबनी, बिहार), रियाज बशीर सय्यद (२५, रा. रोशनगाव, ता. बदनापूर, जि. जालना) व रामलाल रामविलास सिंदरिया (४६, रा. ग्रामयोगाभिगा, ता. मांडील, जि. जहानाबाद, बिहार) असे एकूण ६ कामगार आगीत होरपळून ते मृत्युमुखी पडले.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मध्यरात्री लागलेल्या या आगीत ६ कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत, अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमवण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदतकार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.