मोठी बातमी.. सोमय्या पिता -पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यात आरोपांची मालिक सुरूच आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

या पार्श्वभूमीवर माजी सैनिक बबन भोसले यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात काल मध्य रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ४२०, ४०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत राऊतांचे अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील १ फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. यानंतर राऊतांनी काल पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

यावेळी राऊत म्हणाले, “भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी प्रचार केला आणि लोकांकडून पैसे उकळले. हे पैसे राज्यपालांकडे सुपूर्त करू असे सोमय्यांनी सांगितले. परंतु, जमा केलेले पैसे राज्यपालांपर्यंत पोहोचले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत पुढे असे देखील म्हणाले, आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवलेल्या माहिती हे उघडकीस आले. हा देशद्रोह आहे, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेने यांचा तापास करावा. सोमय्या हे सीए असल्यामुळे त्यांना माहिती आहे की, पैसा कसा पचवायल हे माहिती, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.