आला स्वइच्छा पंढरपुरा । सोडूनिया क्षीरसागरा : पंढरिनाथा ||

0

श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक भगवान महाविष्णु क्षीरसागरी शेषशय्येवर पहुडले आहेत. माता लक्ष्मी हळुवारपणे चरणसेवा करीत आहेत. भगवंताचं आपलं स्वतःचं असं एक ब्रीद आहे. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर पाप वाढेल गो ब्राम्हण दुःखी होतील दुराचारी दुर्जनांमुळे भू – भार वाढेल अशा वेळी भगवंत मग अवतार घेत असतात.

हरिविजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात भगवंताने अवतार कार्याचे प्रयोजन, कारण विस्तृत सांगितले आहे. पृथ्वीतलावर कलियुगात अवतार कार्य पूर्ण झाल्यावर भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी हा भगवंत क्षीरसागरातील आपले आसन सोडून पंढरपूरात स्वइच्छेने आला व विटेवर उभा राहिला असे प्रमाण आपल्या अभंगातून निळोबारायांनी दिले आहे ते म्हणतात:-

आला स्वइच्छा पंढरपुरा। सोडूनिया क्षीरसागरा ॥
पुढे देखोनिया विटे । चरण ठेविले गोमटे ॥
दोन्ही हात कटावरी । ठेऊनी परमात्मा श्रीहरी ॥
निळा म्हणे जगदोध्दार । करीत उभा निरंतर ॥

निळोबारायांची पांडूरंगाप्रती असलेली निःस्सीम भक्ती, प्रेमभाव व त्यांची विठुरायाजवळ असलेली प्रीती, त्यांच्या अंभगातून रोकडा परमार्थ सांगणारी आहे. ते म्हणतात ही भगवंताची इच्छा आहे म्हणून तो क्षीरसागराचे ऐश्वर्य सोडून इयं पंढरीनगरीत आला आहे. पुंडलिकाने वीट दिली आणि तो हळुवारपणे आपले दोन्ही पाय जोडून विटेवर सावकाश उभा आहे. विठुरायाच्या चरणाची शोभा जर तुम्ही विचारत असाल तर पायी पद्म आहे. आरक्त तळवे आहेत. सुकुमार व कोमलांगी असा भगवंत आपले दोन्ही हात कंबरेवर ठेऊन उभा आहे. परमकृपाळु, दयाघन, भक्तांचा सखा पांडुरंग निरंतर अष्टौप्रहर भक्तांची काळजी वाहत आहे. जगदोध्दाराचे कार्य अखंड सुरु आहे. अठ्ठावीस युगे सरली तरीही तो विटेवर उभा आहे. संदर्भ – ‘संताची निवडक भजने’ ह. भ. प. रंगनाथ महाराज खरात आळंदी.

पाहा भुवैकुंठ पंढरी । घरिली सुदर्शनावरी ।।
कैसा महिमा वर्णावा । जेथे वास विठ्ठल देवा ॥

पंढरीनगरीला भु लोकिचे वैकुंठ म्हटले गेले आहे. या नगरीचा संपूर्ण भार सुदर्शनाने तोलून धरला आहे. आणिक काय महिमान् वर्णन करावे जेथे भगवंत वास करतात. हे संताचे माहेर आहे. चंद्रभागा गंगेसारखी निर्मळ नदी पांडुरंगाच्या पायाजवळून वाहते. गरुड हनुमंत हे भगवंताच्या सदैव सेवेत आहेत. आणि या भगवंताच्या दर्शनासाठी साक्षात देव येतात.

उभा वैकुंठ निवासी । देव येती दर्शनासाठी ॥
महाद्वार गरुडध्वज। गगनी झळके तेजः पुंज॥

महाद्वाराजवळ गरुडाने लावलेले ध्वज आहे. तीची प्रभा तेजपुंज चकाकणारी आहे. गगनाला भिडणारी आहे. अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या या महाद्वारात रत्नांची जणु प्रभा फाकली आहे.

संत सनकादिक योगी । किर्तनरंगी ठाकती ॥
निळा म्हणे सात्विकजन । तरती पातकी पावन ॥

जेथे भगवंत आपल्या रुख्मिणी मातेसह राहतात. तेथे भक्त सनकादिक ऋषी, मुनि, ध्यान धारणा, जप, तप करणारे येतात आणि किर्तनात आनंदाने नाचतान. हा सोहळा वैकुंठात म्हणून पंढरीनगरी हे भुलोकीचे वैकुंठ म्हटले गेले आहे. कोरोना था वैश्विक महामारीमुळे दोन वर्षे झाली वारी परंपरा बंद पडली आहे. प्रातिनिधीक स्वरूपात मानाच्या पालख्या जातात पण वाळवंटी भक्तांची जी मांदियाळी या ठिकाणी नेहमी दिसते तशी आज यंदादी नसेल.

भगवंताचे मनी भक्तांप्रति असलेली ही प्रीत पुन्हा लवकर त्या पूर्वपदाला येतो अशी मनोभाने प्रार्थना आपण साऱ्यांनी घरात बसून करू या.. ! जे जे विठ्ठलभक्त आहेत या साऱ्या माझ्या वारकरी मायबापांना नम्र प्रार्थना आहे. प्रभूचिंतनात आपण आपल्या पांडुरंगाचे स्मरण केलं तरी भक्ती चरणाशी लीन होईल.

रमेश जे पाटील
आडगांव ता. चोपडा जि. जळगाव (खान्देश)
९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.