T20 क्रमवारीत राशिद खान पायउतार; भारतीय खेळाडू बनला नंबर वन गोलंदाज…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली असून रवी बिश्नोईने या मालिकेदरम्यान चमकदार कामगिरी केली होती आणि त्यालाही या कामगिरीचा फायदा झाला आहे. रवी बिश्नोई ताज्या रँकिंग अपडेटनंतर नंबर वन टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे बिश्नोईने पाच स्थानांनी झेप घेतली असून बुधवारी ICC T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत बिश्नोईने पाच सामन्यांत नऊ बळी घेतले होते. 23 वर्षीय बिश्नोईचे 699 रेटिंग गुण आहेत, अशा प्रकारे त्याने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (692 गुण) याला पाच स्थानांचा फायदा मिळवून अव्वल स्थानावरून दूर केले.

बिश्नोईने गेल्या वर्षीच भारतासाठी पदार्पण केले होते. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी बिश्नोईला सामनावीर ठरला आहे. बिश्नोईने फेब्रुवारी 2022 मध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने 21 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 34 बळी घेतले आहेत.

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा आणि इंग्लंडचा आदिल रशीद संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर असून दोघांचे ६७९ गुण आहेत. अव्वल पाच गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या महिष तेक्षाना (६७७ गुण) यांचा समावेश आहे. खेळाच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये अव्वल 10 मध्ये बिश्नोई हा एकमेव गोलंदाज आहे, तर अक्षर पटेलने नऊ स्थानांनी झेप घेत 18व्या स्थानावर पोहोचले आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव, ज्याने भारताला T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियावर 4-1 ने विजय मिळवून दिला, तो फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल आहे आणि पहिल्या स्थानावर कायम आहे, तर सलामीवीर त्रतुराज गायकवाड एक स्थान घसरून सातव्या स्थानावर आहे. तर युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल 16 स्थानांनी पुढे 19व्या स्थानावर पोहोचला आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नसला तरीही हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान कायम राखले आहे.

याशिवाय बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर कसोटी क्रमवारीत काही बदल झाले आहेत, तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर वनडे क्रमवारीतही काही बदल झाले आहेत. मात्र, कसोटी आणि वनडेमध्ये अव्वल स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीतही स्थान कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.