जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्याचा उपक्रम तब्बल महिनाभरापासून राबवला जात आहे. या उपक्रमाचा महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जात आहे. यापुढे विविध पिकांच्या उत्पादनासाठी हायटेक तंत्राचा वापर केला तरच उत्पादन वाढेल आणि शेती करणे शेतकऱ्यांना परवडेल. पारंपारिक पद्धतीने अथवा काही साध्या तंत्रज्ञानाने आता शेती करणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यासाठीच हायटेक शेतीचा नवा हुंकार हा उपक्रम जैन उद्योग समूहाने खास शेतकऱ्यांसाठी आयोजित केला आहे. जळगाव जिल्ह्याची केळी उत्पादन करणारा जिल्हा अशी संपूर्ण भारतात ओळख आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात ७५ एकर ७५ हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड केली जाते. जळगावची जमीन केळी उत्पादनासाठी अगदी योग्य अशी आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पिकणाऱ्या केळीची चव काही न्यारीच आहे. तिच्या खाण्यात जो गोडवा आहे, तो इतर ठिकाणी पिकणाऱ्या केळीत नाही. ही एक जळगाव जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या केळीची जमिनीची बाजू आहे. अगदी १५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात अत्यंत पारंपारिक पद्धतीने कोणत्याही नवतंत्राचा वापर न करता इथला शेतकरी केळी पिकत होता. त्याला मार्केटही चांगल्या प्रकारे मिळत होते. केळी उत्पादनाचा खर्चही तेव्हा कमी येत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीचे पिक घेणे परवडत होते. कारण १५ वर्षांपूर्वी केळी पिकावर कोणतेही रोगाचा प्रादुर्भाव होत नव्हता. एकदा केळी लावली की फक्त पाणी आणि खत देत राहिले की १८ महिन्यानंतर केळीचे पीक हाती येत होते. गेल्या काळात मात्र हल्ली परिस्थिती बदललेली आहे. १५ वर्षांपूर्वी पावसाळा चांगला असल्याने विहिरींना मुबलक पाणी होते. गेल्या १५ वर्षात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले आहे. प्रत्येक वर्षाला पाणी टंचाई भासते आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जाते आहे. तेवढे पाण्याचा उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे केळीला १८ महिने पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. त्यासाठी केळी ऐवजी इतर पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने स्पष्ट दिसते. अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण दूषित झालेले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे केळीच्या पिकाला फटका बसतोय. उभे केळीचे पीक जमीन दोस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. केळीवर करपा तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने या रोगाच्या नियंत्रणासाठी औषधीचा वाढत चालला आहे. उन्हाळ्यातील तापमान ४५ अंशापर्यंत जात असल्याने त्या वाढत्या तापमानाचा फटका देखील केळी पिकाला बसतोय. तर हिवाळ्यात अत्यंत कमी तापमानामुळे केळीच्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी हतबल होतो. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतोय. परंतु उघड्या केळी पिकांवर वरील रोग नियंत्रण करणे अवघड जाते. त्यामुळे केळ्याच्या झाडाची वाढ खुंटते उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून तसेच हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून केळी पिकाचे संरक्षण योग्य रीतीने होत नसल्याने केळीचे उत्पादन घटते. त्यातच अवकाळी पाऊस आणि अचानक वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे फार मोठे नुकसान होते. निसर्गाच्या व कृपेचा फटका केळी पिकाला बसतो. केळीचे उत्पादन घटते आणि केळी उत्पादक शेतकरी अक्षरशा कोलमडतो. निसर्गाची अवकृपा झाल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाकडे याचना करतो. या दृष्टचक्रात जळगावचा केळी उत्पादक शेतकरी अडकल्याने केळीचा उत्पादन खर्च वाढत आहे आणि उत्पादन मात्र घटते आहे..

जळगाव जिल्हा केळी पिकवणारा जिल्हा असला तरी आता इतर जिल्ह्यातही विशेषतः सोलापूर जिल्ह्यातही केळी उत्पादनाने भरारी घेतली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हाlaa केळीचे आगार म्हणून कायमस्वरूपी ओळख टिकवण्याची टिकवायची असेल तर आता केळी उत्पादन शेतकऱ्यांनी हायटेक तंत्राच्या तंत्रज्ञानाचा तातडीने स्वीकार करण्याची गरज आहे. अन्यथा सोलापूर जिल्हा नजीकच्या काळात जळगाव पेक्षा पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजही केळी लागवडी जळगाव जिल्ह्यात ७५ हजार हेक्टर क्षेत्रात केली जाते, तर सोलापूर जिल्ह्यात ५१ हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड होते. परंतु सोलापूर जिल्ह्यात जळगावपेक्षा जास्त केळीची निर्यात होते. त्यामुळे निर्यातीतून मोठे उत्पन्न सोलापूरच्या केळी उत्पादकांना मिळते. वास्तविक जळगाव जिल्ह्यात प्रति हेक्टर ३० ते ४० क्विंटल केळीचे उत्पादन शेतकऱ्याला मिळते. परंतु सोलापूर जिल्ह्यात प्रती हेक्टरी २५ क्विंटल इतकेच उत्पादन मिळते. सोलापूरच्या केळी मुंबईला कंटेनरने पाठवण्यासाठी एका कंटेनरला ३० हजार रुपये इतकेच भाड्या द्यावे लागते. तथापि जळगावच्या केळी उत्पादकांना एका कंटेनरला ६५ हजार रुपये भाड्याचा भुर्दंड बसतो केळी निर्यात करण्यासाठी मुंबईला कंटेनर पाठवण्यासाठीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे जळगावची केळी कमी निर्यात होते. सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी साठवण करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची चांगली उपलब्धता आहे. तशा प्रकारचे कोल्ड स्टोरेजेस जळगाव जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने केळी निर्यातीवर परिणाम होतो. त्यासाठी जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादन उत्पादनात आपला मानबिंदू कायम राखायचा असेल तर आता शेतीच्या हायटेक तंत्राचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या जैन उद्योग समूहाने आयोजित केलेल्या हायटेक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणात केळी तज्ञ डॉक्टर के बी पाटील यांनी केळीच्या उत्पादनासाठी हायटेक तंत्राचे प्रत्यक्ष प्रशिक्षण केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिले. त्यात नेट शेड मधील केळी, हरितगृहातील केळी, बंदिस्त केळी लागवड या अत्याधुनिक तंत्राची माहिती दिली. आतापर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सरी ऐवजी गादी वाफा पद्धत, दुहेरी ठिबक सिंचन, द्रवरूप खते व पोषक या तंत्राचा वापर केला आहे. तथापि यापुढे अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे स्वयंचलित मोबाईल कंट्रोल असलेली ऑटोमेशन यंत्रणा फळांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी केळी लागवडीचे शाश्वत मॉडेल तयार करण्याचे संशोधन जैन उद्योग समूहाच्या संशोधन विभागाने केले आहे. त्यासाठी नेट शेड हरितगृह आणि बंदिस्त केळी लागवड क्षेत्र आता विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे वाढते तापमान नियंत्रणात करता येते, अथवा वाढवता येते. नेट शेडमध्ये फॉगर मायडो स्प्रिंकलरचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १६ ते १८ महिन्याच्या केळी उत्पादनाचा कालावधी सध्या १२ महिन्यावर आला आहे. आठ ते नऊ महिन्यात केळीचे उत्पादन निघते आणि उत्पादनात २० टक्के वाढ मिळते. त्यासाठी आता जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हायटेक तंत्राचा वापर केला तरच केळीचे आगार असलेले अस्तित्व टिकून राहील अन्यथा जिल्हा मागे फेकला जाईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.