मोठी बातमी.. हिरानंदानी ग्रुपसह 25 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज आयकर विभागाने देशातील नामांकित असलेल्या हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्याचे वृत्त मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मुंबईसह अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू आहे. दरम्यान हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईमध्ये आयकर विभागाकडून धाडसत्र सुरू आहे. आज सकाळी मुंबई, बंगळुरू, ठाण्यासह देशात एकूण 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. ठाण्यात हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आलीय.

कोट्यवधी रुपयांच्या कर चोरी प्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. रियल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे आणि ठाण्यात बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या कंपनीवर छापा दरम्यान, पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्ट अप्स ग्रुपची कार्यालये आणि संबंधित जागांवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 मार्च 2022 रोजी छापे घातले होते.

ही कंपनी, बांधकाम साहित्याचा घाऊक आणि किरकोळ पुरवठा करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा देशभर वावर असून त्यांची वार्षिक उलाढाल 6000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या शोधमोहिमेदरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात एकूण 23 ठिकाणी करवाई करण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान अनेक महत्वाचे पुरावे -ज्यात कागदपत्रे आणि डिजिटल डेटाचा समावेश आहे, अशी माहिती मिळाली असून हे सगळे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

सदर पुराव्यांवरुन, या कंपनीने अनेक बनावट खरेदी, बेहिशेबी रोखीचे व्यवहार केले असल्याचे आढळले आहे, त्याशिवाय साधारण 400 कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोंदी देखील आढळल्या आहेत. या सगळ्या पुराव्याबाबत कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारे व्यवहार केल्याची कबुली दिली. तसंच, विविध मूल्यांकन वर्षात 224 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न मिळवल्याचेही सांगितले.

ही छापेमारी आणि शोधमोहिमेत असेही आढळले की, या कंपनीला मॉरिशस मार्गे मोठा परदेशी निधी देखील मिळाला आहे. मोठ्या प्रीमियमच्या समभागांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे, असेही लक्षात आले. शोध मोहिमेदरम्यान, मुंबई आणि ठाण्यातील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काही हवाला व्यवहार होत असल्याचेही आढळले. या कारवाई दरम्यान आतापर्यंत, 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आणि 22 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.