अमळनेरात दोघांवर हद्दपारीची कारवाई

0

अमळनेर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील दोन जणांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत.

शहरातील गांधलीपुरा येथील रफीयोद्दीन सिराजोद्दीन शेख उर्फ मेंटल रफिक (वय ५१) तसेच शिरूड नाका परिसरातील दीपक गणेश पाटील (वय ३७) हे दोघे काहीही कामधंदा न करता त्यांच्या साथीदारांच्या मदतीने दमदाटी करतात. त्यांच्यामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. तर २०२४मध्ये लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका असल्याने या दोघांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करावे, असा प्रस्ताव पोलिसांतर्फे उप विभागीय दंडाधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रकरणाची गोपनीय चौकशी करून डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी अहवाल सादर केला होता. या प्रस्तावावर दोन्ही पक्षांकडून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे युक्तिवाद करण्यात आले. त्यानंतर महादेव खेडकर यांनी दोघांना १ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हद्दपार कालावधीत त्यांनी दर महिन्याला नजीकच्या पोलीस स्टेशनला त्याच्या राहण्याचा पत्ता कळवावा आणि राज्याबाहेर जायचे असेल तर १० दिवसाच्या आत संबंधित पोलीस स्टेशनला पोस्टाने अथवा इतर मार्गाने माहिती कळवावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.