मुंबई ;- पुरणाची पोळी, भजी आणि कटाची आमटी असा बेत असेल तर मग खवय्यांची जणू दिवाळीच ही कटाची आमटी कधी खूपच आंबट होते तर कधी अगदीच पांचट होते. असं होऊ नये म्हणून अगदी अचूक माप घेऊन कटाची आमटी कशी करायची ते पाहा.
साहित्य
अर्धी वाटी शिजलेलं पुरण
अर्धी वाटी शिजलेली तुरीची डाळ
५ वाटी पाणी
१ हिरवी मिरची
१ टीस्पून गरम मसाला
१ टेबलस्पून गूळ
१ टेबलस्पून चिंचेचा कोळ
१ टीस्पून जीरेपूड
१ टीस्पून धनेपूड
६ ते ७ कडिपत्त्याची पाने
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग
अर्धा टिस्पून खोबऱ्याचा किस
चवीनुसार मीठ
कृती
कटाची आमटी करण्यासाठी पुरण आणि शिजलेली तुरीची डाळ एकत्र करून छान एकजीव करून घ्या.
यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई चांगली तापली की तेल, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.
फोडणी झाल्यानंतर कडिपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका. ते परतून झाले की त्यामध्ये चिंचेचा कोळ टाका.
यानंतर शिजलेली तुरीची डाळ आणि पुरण टाका आणि पाणी टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
आता यामध्ये गूळ, काळा मसाला, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून आमटीला चांगली उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करा आणि त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम, आंबटगोड चवीची कटाची आमटी झाली तयार