वर्षभरा आधीच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

0

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना आणि लोकसभेच्या निवडणुकी बरोबर घेतल्या गेल्या तर अजून वर्ष बाकी आहे. परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे जाहीर सभेत संबोधन करताना जळगाव ग्रामीण विधानसभा या त्यांच्या मतदारसंघात विरोधकांवर विशेषतः त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या दोन गुलाबरावांवर कडकडून हल्लाबोल केला. वाढदिवसानिमित्त आपल्या मतदारसंघातील जनतेला संबोधन करताना संपूर्ण भाषण विरोधकांवर खर्च केले. भाजपसह सर्व विरोधी पक्ष एकवटून गुलाबराव पाटलांना पराभूत करण्याचा चंग बांधलाय. शिंदे गटाचे 40 आमदार निवडून आले तरी चालतील, पण गुलाबराव पाटील पराभूत झाले पाहिजेत, हा एकच अजेंडा विरोधकांचा आहे, असा आरोप मंत्री गुलाबराव पाटलांनी केला. विशेषतः त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्या बाबत खरपूस समाचार त्यांनी घेतला. ‘ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्या’ यांची उपमा गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकरांना दिली. त्यांना पैशाची मस्ती आली आहे, ते नोटा वाटतील तर आम्हालाही नोटा माहित आहेत. गुलाबराव पाटील आणि त्यांचा मुलगा मतदार संघात सतत जनतेच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मतदारसंघातील जनतेचे जोवर माझ्यावर प्रेम आहे तोवर मला पराभूत करण्याची ताकद कुणातही नाही. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आगामी विधानसभा निवडणुकीत भगवा फडकणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधकांनी मध्ये पोटशूळ उठलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते गुलाबराव टूरटूर करीत आहे, असा आरोप करून गुलाबराव वाघांची खिल्ली उडविली. हशा, टाळ्यांनी जाहीर सभेला जमलेल्या श्रोत्यांकडून गुलाबराव पाटलांना साथ मिळत होती. संपूर्ण भाषणात विरोधकांवर टीका हाच एक मुद्दा गुलाबराव पाटलांच्या भाषणात होता..

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर भाषण म्हणजे निव्वळ ठोकमठाक होती, असा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी एका वृत्तपत्राला दिल्या मुलाखतीत केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील गेल्या दहा वर्षांपासून मंत्री असताना त्यांच्या राहत्या गावी पाळधीत 15 दिवसाला एकदा नळाला पिण्याचे पाणी मिळते. धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी 25 दिवसाला एकदा पाणी मिळते. धरणगावकर महिला पाण्यासाठी हैराण झाल्या आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी हंडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा कॅबिनेट मंत्री असताना वेळेवर पाणी देऊ शकत नाही ही कसली आली कार्यक्षमता? गेल्या दहा वर्षात आपल्या विधानसभा मतदारसंघात एक तरी ठळक विकासाचा प्रकल्प आणलेला असेल तर तो त्यांनी दाखवून द्यावा. केवळ जोशपूर्ण भाषण करून विरोधकांवर टीका केल्याने जनतेचे प्रश्न सुटणार नाही. पाळधी गावातील बस स्टॉप रस्ता माझ्या कारकिर्दीत मी स्वतः केला आहे. पाळधीच्या भंगार बस स्टॅन्डची दुरावस्था माझ्या कारकिर्दीत दूर केलेली आहे. त्यामुळे फुकटच्या गप्पा मारण्यापेक्षा विकासाची कोणती कामे केली ते गुलाबराव पाटलांनी सांगावे. राहता राहिला त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल.. तर ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ राहू द्या.. ही मूठ उघडली तर महागात पडेल.. मुंबईमध्ये घेतलेल्या सदनिकेत कुणी घेतल्या? शेती आणि प्लॉट कुणी घेतले? कुणासाठी तुमचा छुपा व्यवसाय आहे? याची माहिती आम्हाला आहे. ती योग्य वेळी आम्ही चव्हाट्यावर आणू, असा आरोप गुलाबराव देवकरांनी करून, आपल्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमच्यावर बेछूट आरोप केला आहे. मतदारसंघात बाप बेटे कायम फिरत असतात असे जाहीर सांगण्याची गरज काय? त्यांच्यापेक्षा जास्त मी स्वतः आणि माझे कार्यकर्ते मतदार संघात दौरे करून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्री महोदयांनी काय केले? ते दाखवून द्यावे.. केवळ भाषणातून पुळका दाखवल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतात, असाही आरोप गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटलांवर केला. विधानसभा निवडणुकीआधीच जणू रंगीत तालीम रंगत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.