जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीत बिघाडी

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी ११ जागा जिंकून महाविकास आघाडीने पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी हा एक प्रकारे चिंता वाढवणारा निकाल आहे. परंतु बहुमत महाविकास आघाडीकडे असताना सभापती पदाच्या निवडणुकीत जे नाटक घडले त्यामुळे महाविकास आघाडीत ‘एकवाक्यते’ ऐवजी ‘बिघाडी’ झाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे नेतृत्वात जळगाव बाजार समिती निवडणुकीत बहुमत प्राप्त करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम जिंकली खरी; परंतु सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन संचालकांमध्ये जे नाट्य घडले ते घडायला नको होते. सभापती पदासाठी लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर तसेच शामकांत सोनवणे या दोघांनी उमेदवारी अर्ज भरला होता. दोघेही सभापती पदासाठी इच्छुक होते. परंतु दोघांनीही समजून घालून बिनविरोध सभापती पदाची निवडणूक होऊ शकली असती. मात्र लकी टेलर आणि शामकांत सोनवणे दोघेही अडून बसले होते. त्यावेळी शामकांत सोनवणे ( Shamkant Sonawane) यांनी धमकी देऊन लकी टेलरचा अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट दिसून आले. लकी टेलर, त्याचा मुलगा आणि हेमलता नारखेडे या महाविकास आघाडीच्या संचालकांचे मतदान शामकांत सोनवणे यांना झाले नाही. तथापि शिवसेना शिंदे आणि भाजप गटाच्या सदस्यांनी श्यामकांत सोनवणे यांना मतदान केल्याने १५ मतांनी शामकांत सोनवणे विजयी झाले. मात्र यात शिंदे भाजप गटाकडून महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचा यशस्वी कार्यक्रम केला गेला. सभापती निवड झाल्यानंतर शामकांत सोनवणे यांनी, ‘मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी झालो, त्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर आणि चोपडाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे (Chandrakant Sonavane) यांचे आशीर्वाद’ लाभल्याचे शामकांत सोनवणे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) गुलाबराव पाटील यांनी सावरासावर केली. लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांचा सभापती पदासाठी भरलेली उमेदवारी अर्ज वेळ कमी असल्याने माघार घेता आली नाही, म्हणून ही निवडणूक झाली. लकी टेलर यांनी पत्रकारांसमोर जे शामकांत सोनवणे विरुद्ध आरोपाचे वक्तव्य केले, ते गैरसमजातून केले. आज शामकांत सोनवणे यांची सभापती पदाची कारकीर्द एक वर्षासाठी असून त्यानंतर सभापती पदी कोण राहील? त्याचे अधिकार गुलाबराव देवकारांकडे असल्याचे स्पष्ट केले. पांडुरंग पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.

जळगाव (Jalgaon) बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे शामकांत सोनवणे यांची एक वर्षासाठी निवड झाल्याने सांगण्यात येत असले, तरी काळात महाविकास आघाडीचे संचालक संचालकांत एकोपा कितपत राहील याची शाश्वती देता येत नाही. महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे शामकांत सोनवणे हे उमेदवार आहेत. परंतु सभापती पदाच्या निवडणुकीत जी दादागिरी शामकांत सोनवणे यांनी केली ती दादागिरी ज्यांचे नेतृत्वात बाजार समितीच्या निवडणूक लढवली त्या गुलाबराव देवकरांनाही आवडली नसणार. परंतु जिल्हा बँक चेअरमन पदाच्या निवडणुकीत संजय पवार यांनी बंडखोरी करून शिंदे भाजप गटाच्या सहकार्याने चेअरमन पद पटकावले त्याप्रमाणे शामकांत सोनवणे यांना सभापती पद दिले गेले नसते तर कदाचित बंडखोरी झाली असती. कारण पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या सात संचालकांनी सभापती पदाच्या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांनाच मतदान केले आहे. त्यामुळे शामकांत सोनवणे ऐवजी महाविकास आघाडीतर्फे लकी टेलरला सभापती पदाचे उमेदवार अधिकृत घोषणा केली असले तर शामकांत सोनवणे यांनीही बंडखोरी केली असती आणि त्यातून महाविकास आघाडीकडे बहुमत असूनही बंडखोर उमेदवार विजयी झाला असता. ही बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकरांनी ते पाऊल उचलले ते शहाणपणाचेच म्हणता येईल. परंतु आगामी काळात शामकांत सोनवणे हे जरी महाविकास आघाडीचे सभापती असले, तरी त्यांच्या नंतर शिंदे भाजप गटाच्या वर्चस्व राहील एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकरांना तारेवरची कस करावी लागणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.