जिल्ह्यात उष्माघाताचा अजून एक बळी; वावडद्याच्या उपसरपंचाचा मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

प्रचंड वाढणाऱ्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. आणि त्यामुळे अनेकांना जीवालाही मुकावं लागत आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा येथे अजून एक उष्माघाताने बळी गेला आहे. वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (45) यांचा उष्माघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. शुक्रवारी दिवसभर उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम केल्यानंतर घरी आल्यावर त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

परीसरात बिबट्याचा वावर असल्याने भीती पोटी शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत त्यामुळे कमलाकर पाटील हे स्वतः शेतात मका काढण्यासाठी गेले होते. त्यांनी शुक्रवारी दिवसभर उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम केले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना शौच व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी घरगुती उपचार केले मात्र तरीही सुधारणा न झाल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कमलाकर पाटील हे वावडदा माध्यमिक विद्यालयाचे चेअरमनही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुले व भाऊ असा परीवार आहे. दरम्यान, याच गावातील उखई विक्रम जाधव (35) या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. सलग दुसर्‍या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने शनिवारी गावातील व्यवहार व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.