ग्रामपंचायत निवडणुक; जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर 2021 मध्ये निवडून आलेल्या सदस्य, सरपंचांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील 1494 सदस्यांना तर 153 सरपंचांना लाभ होणार आहे.

अ.भा.सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या महिन्यात मंत्रालयात ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेवून सदस्य व सरपंचांना थेट अपात्र करण्याच्या निर्णयाने ग्रामविकासात येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढण्याचे निवेदन दिले होते.

त्यानंतर मंत्रीमंडळाने सदस्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याने राज्यभरातील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 2021 मध्ये जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. यात सुमारे अठराशे ग्रामपंचायत सदस्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातून राखीव जागांवर निवडून आले होते. अशा सदस्यांना दोन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील सुमारे पंधराशे सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. जिल्ह्यात पंधराशे सदस्य व 153 सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार होती.

जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात अनेक सरपंच, सदस्यांनी कोर्टात धाव घेतली होती.मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 2021 मध्ये झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा वर्षभराची मुदतवाढ देण्यात आल्याचे सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.